अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये जिल्हाधिकारी पंकज आशिया व प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दरम्यान, शहरांमधील 14 मंडळांसाठी 12 तास मिरवणूक सुरू होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अधिपत्याखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरासह जिह्यामध्ये गणरायाला आनंदामध्ये निरोप देण्यात आला.

प्रथेप्रमाणे सकाळपासूनच शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची आरती केल्यानंतर माळीवाडा, बंगाल चौकी, धरती चौक, सर्जेपुरा यामार्गे रामचंद्र खुंटापर्यंत हा गणपती मिरवणूक विसर्जनच्या दिशेने जात होता. अनेकांनी घराबाहेर सडा, रांगोळी टाकत फुलांची सजावट करत मानाच्या गणपतीचे पूजन केले. बालगोपाळांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण सहभागी झाले होते. दुपारी दोन वाजता रामचंद्र खुंटापाशी महापालिका अधिकाऱ्यांनी मानाच्या गणपतीची आरती केली व त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, विजय कोथिंबिरे, मयूर बोचुगळ, नितीन पुंड उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नेता सुभाष चौकामध्ये युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड व शशिकला राठोड यांच्यासह पदाधिकाऱयांनी मानाच्या गणपतीची पूजा केली.

राठोड व जगताप समर्थक आमने-सामने

नेता सुभाष चौकामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यालय आहे. या ठिकाणी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी गणेशभक्तांचे स्वागत केले. यावेळी जगताप समर्थक एक मंडळ या ठिकाणी आले व त्यांनी जगतापांच्या नावाने डीजे लावून जगतापांचे फोटो झळकवले. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हिंदू धर्मरक्षक दिवंगत अनिल भय्या राठोड यांचे फलक फडकावत शक्तिप्रदर्शन करत त्यांना प्रतिउत्तर दिले. यावेळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

उपनगरामध्ये मिरवणुका

गणरायाला निरोप देण्यासाठी नगर शहरातील केडगाव, सावेडी, बोल्हेगाव यासह विविध उपनगरांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने विविध ठिकाणी सकाळपासूनच मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष असा पोलीस बंदोबस्त होता. महानगरपालिकेने ज्या ठिकाणी गणपती विसर्जनाची कृत्रिम हौदाची सोय करून दिली होती तेथे घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी या ठिकाणी विसर्जन केले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अधिपत्याखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी डीजे घेतले ताब्यात

निवडणुकीमध्ये सात मंडळांनी मोठ्या प्रमाणामध्ये डीजे लावले होते, जे नियम आखून दिले होते त्याचे उल्लंघन करण्यात आलेले होते. रात्री 12 वाजता मिरवणूक संपल्यानंतर त्याच ठिकाणी पोलिसांनी संबंधित डीजे ताब्यात घेतले व त्यानंतर त्यांच्यावर तोफखाना ठाण्यामध्ये कारवाई करत डीजे जप्त केले.

मानाच्या गणपतीची पूजा प्रत्येक ठिकाणी करण्यात आली, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वेळ गेला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मानाचा गणपती रात्री उशिराने बाहेर पडला; पण दुसरीकडे वेळेमध्ये इतर गणपती दिल्ली गेटपाशी बाहेर पडतील अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा 14 मंडळांसाठी 12 तासांचा अवधी विसर्जन मिरवणुकीसाठी लागला.