
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी बारा वर्षं पूर्ण होत आहेत. या प्रकरणी आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मात्र हत्येचा सूत्रधार मोकाटच असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्याला कधी शोधणार, असा सवाल ‘अनिस’ने आज पत्रकार परिषदेत केला.
डॉ. दाभोलकर, काॅ. पानसरे, प्रा. कुलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांमागील सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना धोका कायम असणार आहे. डॉ. दाभोलकर खून खटल्यामध्ये विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनावळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका झाली आहे. याबाबत सीबीआयने अजूनही उच्च न्यायालयात दाद मागितलेली नाही. सीबीआयने लवकरात लवकर याचिका दाखल करावी, अशी मागणी डॉ. हमिद दाभोलकर यांनी केली.