
हिंदुस्थानचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवल्या प्रकरणी ट्विटरने संसदीय समितीची लिखित माफी मागितली आहे. ट्विटरने 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्या चुकीच्या सुधारणा करू असं माफीपत्रात सांगितलं आहे.
याबाबत माहिती देताना भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी सांगितलं की, ट्विटरच्या मुख्य गोपनीयता अधिकाऱ्यांनी माफीपत्रात आपली चूक स्वीकारली आहे. लडाखचा एक भाग चुकीच्या जिओ टॅग केलेला आणि तो चीनचा भाग म्हणून दर्शविला गेला. ही चूक सुधारण्यासाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतचा कालावधी लागेल, असं त्यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
ट्विटरने लेह लडाखला हा चीनचा भाग असल्याचं आपल्या नकाशात दाखवलं होतं. यानंतर केंद्र सरकारने यावर आक्षेप घेत ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देण्यासाठी ट्विटरला पाच दिवसाचा वेळ देण्यात आला होता. यावरच आता ट्विटरने माफी मागत आपली चूक स्वीकारली आहे.

























































