
हिंदुस्थान आणि चीनमध्ये महिन्याभरापासून लडाख सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच ‘अमूल’ने चीनवर बनवलेल्या एका व्यंगचित्रावरून ट्विटरने त्यांचे अकाउंट सस्पेंड केले आहे. त्यांचे अकाउंट सस्पेंड केल्यानंतर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान ट्विटरने पुन्हा अमूलचे अकाउंट सुरू केले आहे. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून अमूल चीनवर कॉमिक स्टाईलमध्ये व्यंगचित्र मोहीम चालवत आहे. अमूल गर्ल सोबत एका ड्रॅगनचे व्यंगचित्र तयार करण्यात आले आहे. ज्यात अमूल गर्ल ड्रॅगनला बाहेर निघून जा म्हणताना दिसत आहे.
अमूलने ट्विट केलेल्या या व्यंगचित्रावर मोठमोठ्या अक्षरात ‘मेड इन इंडिया’ असे लिहिले आहे. या पोस्टवर ट्विटरने आपले खाते तात्पुरते बंद करण्यात येत आहे, असा मेसेज करून हे अकाउंट बंद केले होते. मात्र काही वेळानंतर ट्विटरने पुन्हा एकदा हे अकाउंट सुरू केलं आहे.





























































