ट्विटरला बसला दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter)ला एका कायदेशीर प्रकरणामध्ये भला मोठा म्हणजेच तब्बल 4,50,000 युरो अर्थात साधारण साडेचार करोड रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. नव्या युरोपियन युनियन डाटा प्रायव्हसी सिस्टिमअंतर्गत आयर्लंड देशाच्या डाटा नियामक मंडळाने ट्विटरवरती ही कारवाई केली आहे.

युरोपियन युनियनने 2018 साली जनरल डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (GDPR) कायदा संमत केला आहे. या कायद्याअंतर्गतच ही कारवाई करण्यात आली. जनरल डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशन संमत झाल्यापासून कोणत्याही अमेरिकन पंपनीवरती झालेली ही पहिलीच कारवाई आहे. ट्विटरवरदेखील या कायद्याद्वारे झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

ट्विटरवरती आलेल्या एका बगमुळे यूजर्सची गोपनीयता भंग झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 2018 डिसेंबरच्या सुमाराला ट्विटरच्या अँड्राईड ऑप्लिकेशनमध्ये हा बग आला होता. या बगमुळे अनेक ट्विटर वापरकर्त्यांचे खासगी ट्विटस् हे सार्वजनिक झाले होते. या बगसंदर्भात आपल्या यूजर्सना तातडीने सावधान करण्यात ट्विटर अपयशी ठरल्याने हा दंड ठोठावण्यात आलेला आहे.

2018 साली नाताळच्या सणावेळीच हा बग अचानक उपटला आणि त्यावेळी आमचे अधिकतर कर्मचारी हे सुट्टय़ांवर होते त्यामुळे आम्ही या बगसंदर्भात आमच्या यूजर्सना तातडीने सावध करू शकलो नाही, असे यासंदर्भात ट्विटरने स्पष्टीकरणदेखील दिले होते.

ट्विटर या चुकीची पूर्ण जबाबदारी घेत असून आमच्या यूजर्सच्या डाटा आणि खासगी माहितीचा आम्ही कायमच आदर करतो आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजीदेखील घेतो. यापुढे अशी कोणतीही घटना घडल्यास त्वरित त्याची माहिती आमच्या यूजर्सपर्यंत पोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू असे सांगत 2019मध्ये ट्विटरने या घटनेसंदर्भात माफीदेखील मागितली होती. जानेवारी 2019मध्ये सर्वात आधी हा बग दृष्टिपथात आला. 3 नोव्हेंबर 2014 पासून 14 जानेवारी 2019पर्यंत आपल्या खात्यात प्रोटेक्ट युवर ट्विट हे सेटिंग निवडणारे यूजर्स या बगमुळे अडचणीत आले होते.