
दोन हजार किमतीच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. टिळक नगर रेल्वे स्थानक परिसरात दोघांमध्ये या बनावट नोटांची देवाणघेवाण सुरू असताना पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्याकडून दोन हजार किमतीच्या 255 बोगस नोटा जप्त करण्यात आल्या.
टिळक नगर रेल्वे स्थानकाबाहेर काही इसम बनावट नोटा घेऊन येणार असून त्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाला (सीआययू) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून बनावट नोटांची देवाणघेवाण करत असताना मोहम्मद अर्शद आणि लवेश तांबे असे दोघांना रंगेहाथ पकडले. अर्शद हा बनारसचा असून लवेशला तो बनावट नोटा देण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी अर्शदची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार किमतीच्या 255 नोटा मिळाल्या. पाच लाख 10 हजार किमतीच्या त्या बनावट नोटा आहेत. अर्शदने या नोटा कुठून आणल्या, त्याने अजून कुठे अशा बनावट नोटा वितरित केल्या याचा सीआययू युनिट अधिक तपास करीत आहे. दरम्यान, काळी जादू करण्यासाठी या नोटांचा वापर करण्यात येणार होता असाही संशय व्यक्त करण्यात येत असून त्यादृष्टीनेदेखील पोलीस तपास करीत असल्याचे सूत्रांकडून समजते.





























































