बनावट आधार कार्ड बनवून देणाऱया दोघांना चारकोप पोलिसांनी अटक केली. मोहम्मद खान आणि मोहम्मद शेख अशी त्या दोघांची नावे आहेत. एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संदीप जाधव हे चारकोप पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकात कार्यरत आहेत. चारकोपच्या बंदरपाखडी कोळी गावातील एका चाळीत एक जण बनावट आधार कार्ड वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने ते आधार कार्ड चारकोप येथे एकाकडून बनवून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक शेळके, सहाय्यक निरीक्षक सुधीर चव्हाण, उपनिरीक्षक तेजाळे, वारे, जाधव, थोरात आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलीस चारकोप येथील एका सोसायटीत गेले. तेथे काही जण बसले होते. पोलिसांनी खान आणि शेखची चौकशी केली. ते सेंटर एकाच्या मालकीचे असल्याचे उघड झाले. घटनास्थळाहून पोलिसांनी कागदपत्रे, लॅपटॉप, प्रिंटर, थम स्कॅनर, कॅमेरा, जीपीएस डिवाईस, बनावट जन्माचे दाखले, पॅन कार्ड, मृत्यू दाखला असे साहित्य जप्त केले. पोलिसांनी खान आणि शेखविरोधात गुन्हा दाखल करून त्या दोघांना अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.