उपचारासाठी लातूरमध्ये आलेल्या युवकाला लुटून खून; दोघांना अटक, एक फरार

2207

मुरुड येथे उपचारासाठी लातूरमध्ये आलेल्या युवकाला लुटून त्याचा खून केल्याचा भयंकर प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी उदगीर येथील जावेद शेख याच्यासह मध्यप्रदेशातील त्याचा साथीदार जावेद जाफर कुरेशी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार मात्र अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लातूर शहरातील गोरक्षण येथील विहिरीमध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह 25 सप्टेंबर 2019 रोजी सापडलेला होता. हा मृतदेह मुरुड येथील भारत सुधीर महाजन (23) या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले होते. तो उपचारासाठी लातूरमध्ये आला होता. लातूर बसस्थानकातून त्याच्याशी मैत्री करून तिघांनी त्याला रेल्वेस्थानकाकडील निर्जनस्थळी नेले होते. त्या ठिकाणी त्यास लुटण्यात आले. त्याच्याजवळील रोख रक्कम, आधारकार्ड, मोबाईल, सोन्याची अंगठी काढून घेण्यात आलेली होती. या लुटीवेळी त्याने विरोध केल्याने त्याची हत्याही करण्यात आली.

हा खून उदगीर येथील जावेद महेबुबसाब शेख (रा.बीदरगेट उदगीर) याने केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार जावेद याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर दोघांच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलीस पथकाने हैदराबाद येथून मह.मुजाहिद उर्फ जावेद कुरेशी याला अटक केली. कुरेशी मूळचा इंदौर मध्यप्रदेशचा असून हैद्राबाद येथे बिगारी काम करत होता. त्याच्याकडून तरुणाचा रेडमी कंपनीचा मोबाईल, आधारकार्ड व इतर एक आधारकार्ड जप्त करण्यात आले. जावेद महेबुबसाब शेख याच्याकडून तरुणाची अंगठी जप्त करण्यात आली आहे.

या दोघांचा तिसरा साथीदार फरार झालेला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सदरील खुनाचा गुन्हा उघडकीस येऊन दोघांना अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक लाकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, उपनिरीक्षक पठारे, कर्मचारी शेख, बेल्लाळे,माने, चामे, सोनटक्के, शिंदे, मुळे, कोंडरे, कांबळे, पाचपुते, चालक सावंत यांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या