
गुजरातमधील व्यावसायिकाचे दहा लाख रुपये घेऊन पळालेल्या दोघांना रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. नीलेश कलसूलकर आणि प्रवीण शुक्ला अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे दहिसर आणि मालाड येथील रहिवासी आहेत. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते कांदिवली येथे राहतात. त्यांचे कपड्याचे दुकान आहे. ते कपडे खरेदीसाठी गुजरात येथे जात होते.
सोमवारी सायंकाळी ते गुजरातला जाण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आले. तेथे आल्यावर त्यांनी गुजरातला जाणाऱ्या एक्स्प्रेसची चौकशी केली. त्यानंतर मुख्य हॉलमधील कॅन्टीन येथे गेले. तेथे साध्या वेशातील दोन जण आले. त्यांनी ते पोलीस असल्याचे भासवले. त्यानंतर त्या दोघांनी व्यावसायिकाची बॅग तपासणीसाठी मागितली. तेव्हा व्यावसायिकाने आपण कपडे खरेदीसाठी गुजरातला जात असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे पैसे बॅगेत ठेवल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. तक्रारदार हे कोणताही पुरावा देऊ शकले नाही. त्याचा फायदा ठगाने घेतला. पुरावा आणल्याशिवाय पैसे देणार नाही असे सांगून ते निघून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली.