वाहनाच्या काचा फोडून बॅगा लांबवणारे दोघे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनाच्या काचा फोडून  मागच्या सीटवर ठेवलेल्या बॅगा चोरणाऱ्या दोघांना वांद्रे आणि विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. युसूफ रशीद शेख आणि गौतम जनार्दन तांबे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे विलेपार्ले येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपली गाडी विलेपार्ले येथील एका हॉटेलजवळ पार्क केली होती. चोरटय़ांनी त्यांच्या गाडीची काच फोडून लॅपटॉप आणि कागदपत्रे असलेली बॅग लांबवली होती. याबाबतची तक्रार त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता युसूफने चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. तर दुसरी घटना वांद्रे परिसरात घडली. जोगेश्वरी येथे राहणारे तक्रारदार हे जानेवारी महिन्यात त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वांद्रे येथे आले होते. तक्रारदार हे हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांनी त्याच्यासोबत असलेल्या चालकाला हॉटेल परिसरात गाडी पार्क करण्यास सांगितले. त्यानुसार चालकाने तेथे गाडी पार्क केली. रात्री तक्रारदार हे घरी जाण्यास निघाले तेव्हा त्यांच्या गाडीची काच फोडून मागच्या सीटवर ठेवलेली बॅग चोरी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने याची माहिती तक्रारदार यांना दिली. तक्रारदाराने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान गौतमला मुंबई परिसरातून अटक केली.