बेशिस्त पोलीस कर्मचाऱ्यांवर अधीक्षकांची कारवाई   

सामना प्रतिनिधी । बीड
पोलीस दलातील बेशिस्त आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन पोलीस कर्मचाऱ्यांना बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. गुन्हेगारांशी असलेले संबंध आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून एका राजकिय पुढाऱ्याला त्याच्या विरोधात होणाऱ्या कारवाईची माहिती देणाऱ्या पोलीस कर्चाऱ्यावर निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली आहे. अधीक्षकांच्या कारवाईमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी धडक कारवाई सुरु केली आहे. ठिकठिकाणी धाडसत्र सुरू ठेवत गेल्या पंधरा दिवसात तब्बल एक कोटीचा गुटखा पकडला आहे. तसेच अतर गुन्हेगारी प्रकरणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरु असताना दुसरीकडे पोलीस दलातील काही कर्मचारी बेशिस्त वर्तन करत असल्याचे समोर आल्याने पोलीस अधिक्षकांनी धाडसी निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांशी असलेला संबंध आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख जुबेरोद्दीन व सुर्यकांत टाकळे या दोघांना बडतर्फ केले आहे. तर राजकिय पुढाऱ्याला त्याच्या विरोधात होणाऱ्या कारवाईची माहिती दिल्या प्रकरणी पोलीस नाईक विष्णू वायभसे यांना निलंबित करण्यात आले आहे.