नगरपंचायत नूतन इमारतीसाठी सव्वा दोन कोटींची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

देवरुख ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यापासून पूर्वीची इमारत छोटी होत असून नूतन इमारतीची सातत्याने मागणी केली जात होती. या इमारतीच्या बांधकामाकरिता पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत सव्वादोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावाला मासिक सभेत सर्वानूमते मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता नगरपंचायतीची नूतन इमारत लवकरच उभी राहणार आहे.

सन २०१३ साली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक निवडणूक पार पडली तरी इमारत जैसे थे होती. सर्व विभागांना स्वतंत्र दालने आवश्यक असतांना सध्या एका छताखाली दाटीवाटीने कारभार केला जात आहे. यामुळे स्वतंत्र आणि सुसज्ज इमारतीची गरज निर्माण झाली आहे. परिणामी नूतन इमारती करीता प्रयत्न सुरु करण्यात येवून प्रस्ताव देखील करण्यात आला. या प्रस्तावाला कोकण आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली होती. मात्र निधीची तरतूद न झाल्याने गतवर्षी पासून मंजूर असलेल्या या कामाला पुढे चालना शकली नव्हती. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत इमारतीला प्राधान्य देण्यासाठी नगराध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी मासिक सभेत या इमारती करीता सव्वा दोन कोटी रुपये निधीची तरतूद करुन त्याला मंजुरी घेतल्याने आता इमारत उभाराणीचा मार्ग मोकळा झाला आहे.