
सामना प्रतिनिधी । मुंबई
अंधेरी पूर्वेकडील मिलिटरी मार्गावर असलेल्या पीएनबी बँक सोसायटीतले पीएनबी बँकेचे एटीएम सेंटर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पसार झालेल्या झारखंडच्या दोघा दरोडेखोरांना एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
29 डिसेंबरच्या पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास पीएनबी बँकेचे एटीएम सेंटर कोणीतरी फोडत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. हे कळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली, पण पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच दरोडेखोर तेथून पसार झाले. त्यानंतर शांत न बसता पोलिसांनी खबर्यांना कामाला लावून चोरांचा शोध सुरू केला. अखेर खबर्याने दिलेल्या माहितीनुसार केशव पंडित या चोराला पहिले पकडले. त्याच्या चौकशीत दिनेश यादव याचे नाव समोर आल्यानंतर त्यालाही पकडले. दोघांनी एटीएम सेंटर लुटण्याचा प्रयत्न केला होता याची कबुली दिली. दोघेही मूळचे झारखंडच्या गिरीधीचे रहिवासी असून दोघांनी आधी असे गुन्हे कुठे केले आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.
दाखवायचे चालक पण…
आरोपींपैकी एक रिक्षा चालवतो तर दुसरा कॅब चालक आहे. दिवसा दोघेही चालकाचे काम करतात. मग पहाटेच्या अंधारात ते त्यांचे मूळ काम म्हणजेच लुटमार करण्याचा प्रयत्न करतात. गाडी चालवताना कुठे हात साफ करता येईल हे ते शोधतात. मग रात्री त्या ठिकाणी काम फत्ते करण्याचा कट आखतात, असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
कॅमेर्यात कैद होऊ नये म्हणून आयडिया
त्या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. आपण कॅमेर्यात कैद होऊ नये म्हणून दोघांनी सेंटरमध्ये घुसल्याबरोबर आधी कॅमेर्यांवर कलर स्प्रे मारून तो ब्लर केला, पण ऐवढं करूनही दोघे लटकले.





























































