ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन कुत्र्यांचा शॉक लागून मृत्यू

321

उरण नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा त्रास येथील नागरीकांना सहन करावा लागत असे. आत्ता मात्र या रस्त्यांच्या कामामुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडत आहेत. सेंट मेरी हायस्कूल जवळ अशाच प्रकारे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात एक उच्च दाबाची भूमिगत केबल तुटली, मात्र ठेकेदाराने त्याची कल्पना महावितरणला न देता तशीच उघडी सोडून घरी निघून गेला. त्यामुळे या केबल मधील वीजेचा धक्क येथील दोन बेवारस कुत्र्यांना झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने शाळा सुटली असल्यामुळे येथे मोठा अनर्थ झाला नाही. शाळा सुटल्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांची येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

कुत्र्यांचा तडफडून मृत्यू होत असल्याचे नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी या बाबत ताबडतोब महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळविले आणि वीज पुरवठा बंद केला. मात्र या घटनेनंतर ठेकेदार, नगरपरिषद आणि महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. दैव बलवत्तर म्हणून ही घटना कुत्र्यांच्या जीवावर बेतली. मात्र या ठिकाणी माणसांची वर्दळ असती तर मोठा अनर्थ झाला असता.

या बाबत महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे यांना विचारणा केली असता ठेकेदाराने काम करताना त्याच्याकडून केबल कट झाली मात्र याची कल्पना आम्हाला न देता ती केबल तशीच उघडी टाकून परस्पर निघून गेला. त्यामुळे दोन कुत्र्यांना वीजेचा धक्का लागला आणि ते मृत्युमुखी पडले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वीज पुरवठा खंडीत करून आत्ता ती केबल पूर्ववत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या