महावितरणचा गलथान कारभाराचा कळस, झिजलेली विद्युत तार कोसळून दोन कुत्रे ठार

सामना प्रतिनिधी, चारठाणा

जिंतूर तालुक्यातील चारठाणा शेतशिवारात मुख्य प्रवाह असलेली विद्युत तार अंगावर कोसळून दोन श्वानांना आपल्या जीवाला मुकावे लागले. तर त्यांच्या शेजारीच असलेले शेतमालक व कामगार मात्र सुदैवाने बालबाल बचावले. ही घटना आज सकाळी 10 वाजता घडली. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निष्क्रीयता यावरुन दिसून येते. या घटनेमुळे चारठाणा गावसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतामध्ये काम करताना जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावात शेतकरी विलास मेहत्रे हे नेहमी प्रमाणे शेतातील काम करीत असताना यांच्या शेतातून जाणारी मुख्य विद्युत प्रवाहाची तार आज सकाळी 10 वाजता आचानक तुटली. वेळीच प्रसंगावधान झाल्याने सुदैवाने ते व त्यांच्या सोबत असलेले कामगार बालंबाल बचावले. परंतु तीच तार त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर कोसळळी यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. चारठाणा व पसिरातील महावितरणाच्या मुख्य विद्युत पुरवठा करणारी आणि इतरही बहुतांश तारा या अतिशय कुजकट आणि जिर्ण झाल्या आहेत.

परिसरातील अनेक ठिकाणाच्या मुख्य विद्युत पुरवठा एल.एन.के.व्ही.च्या तारा व चारठाणा येथील गावातील तारा हलक्याशा वारा सुटला तरी तारा लोंबकळत असलेल्याने तारांचे एकमेकांना घर्षण होऊन तारा तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसापूर्वी गावातील शिक्षक नारायण गडदे याच्या घरावर मुख्य विद्युत तार आचानक तुटली. यामध्ये या घटनेत गडदे याच्या आई व मुलगा बालबाल बचावले होते. तारा तुटण्याचे हे सत्र सुरूच आहे. अर्ज, विनंत्या, तक्रारी करुनही याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासनाची केवळ खैरात दिल्या जाते.