
गुहागर तालुक्यातील बोऱ्या नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघेजण बुडले आहेत. गुरूवारी सायंकाळी 4 दरम्यान ही घटना घडली. वैभव देवळे (30) आणि अनिकेत हळे अशी बुडालेल्यांची नावे असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी सहा दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन सुरू झाले. यावेळी काहीजण स्वतः नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी उतरत होते. गुहागर तालुक्यातील बोऱ्या येथील जेटीवर अशाच प्रकारे विसर्जन सुरू असताना सायंकाळी 4 वाजता गणपती विसर्जन करण्यासाठी वैभव देवळे आणि अनिकेत हळे हे दोन्ही तरुण नदीपात्रात उतरले होते. गणपती विसर्जन करून देखील ते बराचवेळ नदीपात्रातून बाहेर आलेच नाहीत. सुरुवातीला हे कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु बराचवेळ होऊन देखील हे तरुण बाहेर आले नसल्याने शोधाशोध सुरू झाली. मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाईक आणि पोलिसांनी नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्यात यश आले नव्हते. गुहागर पोलीस ठाण्यात या बाबत माहिती देण्यात आली असून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले असून त्या दोघांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.



























































