
ओडिशाहून गांजा आणून तो मुंबई, ठाणे, नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरात विकणाऱया दोघा ड्रग्ज माफियांच्या ट्रॉम्बे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रिक्षात भरून गांजा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडत त्यांच्याकडून तब्बल 22 किलो 230 ग्रॅम वजनाचा व 4 लाख 43 हजार किमतीचा गांजा जप्त केला.
ट्रॉम्बे बस टर्मिनल जुनी जेटी मार्गावरून दोघे ड्रग्ज माफिया एका रिक्षातून गांजाचा साठा घेऊन जाणार असल्याची खबर ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि सुशील लोंढे, उपनिरीक्षक शरद नाणेकर, मनोज ठाकूर व पथकाने सापळा रचून उत्तम साहू आणि दिनेश घाडगे यांना अटक केली.
उत्तम हा ओरिसाचा तर दिनेश ठाण्यात राहतो. दोघेही गांजा ठाणे, मुंबई, नवी मुंबईत विकतात. साहू याने ओरिसाहून हा गांजाचा साठा आणला होता. त्यानंतर तो गांजा विकण्यासाठी दोघेही घेऊन जात होते. पण तत्पूर्वीच ट्रॉम्बे पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून 22 किलो वजनाचा गांजाचा साठा जप्त केला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.