खून करून फरार झालेल्या दोघांना सुरतमधून पकडले; फरासखाना पोलिसांची कामगिरी

पुणे शहरातील मंगळवार पेठेत बेघर व्यक्तीचा काठीने मारहाण करीत खून केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुजरातमध्ये पसार झालेल्या दोघांना सुरत शहरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून दोघांचा माग काढला. सीताराम रामकरण बागरी (35, रा. कोटा, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहिर अमर शेख चौकात 27 जुलैला सकाळी नागरिकांना एक अज्ञात व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली होती. पोलिसांना माहिती मिळताच जखमी व्यक्तीस ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोक्यास जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यावरून त्याचा खून झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फरासखाना पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्रीच्या वेळी बेघर व्यक्तीला छत्री विक्री करणाऱ्या दोघांनी काठीने मारहाण केल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावरील आणि चौकातील सीसीटीव्ही पडताळून पाहिले.

रेल्वे कॉलनीच्या बाजूस आलेल्या पदपथावर तंबूमध्ये राहणारे दोघे जण काठी घेऊन बाहेर आले आणि त्यांनी बेघर व्यक्तीस मारहाण केल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता ते दोघे गुजरातमधील सुरत शहरात जाऊन राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, मेहबूब मोकाशी, आकाश वाल्मिकी, अभिनय चौधरी, वैभव स्वामी, ऋषिकेश दिघे यांचे पथकाने सुरतमधून दोघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंगे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, सचिन सरपाले, तुषार खडके, पंकज देशमुख, अकबर कुरणे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या