
राज्य सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र भाजपकडून केले जात आहे. यासंदर्भात आज काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून केल्या जाणाऱया गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. कोणी पत्र दिले म्हणून त्यांचा राजीनामा घ्यायचा हे योग्य नाही अशी भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केली होती. त्याचप्रमाणे एच. के. पाटील यांनी काँग्रेसचे नेते यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले होते. तर राशीद अल्वी यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा आणि क्लीन चिट मिळाल्यास पुन्हा शपथ घ्यावी असाही सल्ला दिला होता.
याचसंदर्भात काँग्रेसमध्ये आज झालेल्या बैठकीत वेगवेगळी मते मांडण्यात आली. या बैठकीला बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विजय वडेट्टीवार, पशुपालनमंत्री सुनील केदार, मत्स्य -व्यवसायमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरण सिंह सप्रा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.






















































