परळीत दोन गटात तुंबळ हाणामारी; दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

वैजनाथ पायर्‍यांच्या शेजारी बैलवाडीसमोरील प्रांगणात चांदापूर येथील दोन गटात सिनेस्टाईलने हाणामारी झाली. यात एका महिलेचे दात पाडल्याप्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळवूनही परळी शहर पोलीस वेळेवर घटनास्थळी आले नसल्याने हा प्रकार घडला आहे. अशाच प्रकारची घटना आर्यवैश्य मंदिरासमोर सायंकाळी घडली. परळी शहर, संभाजीनगर, ग्रामीण पोलीस ठाणे ही तीन पोलीस ठाणे शहरात असतानाही परळीत अनुचित प्रकार घडतात कसे असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सामाजिक शांतता भंग करणार्‍या अशा घटनांकडे शहर पोलीस डोळेझाक करत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

वैजनाथ पायर्‍यांच्या शेजारी असलेल्या बेलवाडी येथे लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान बेलवाडी समोरील आठवडी बाजार भरत असलेल्या मैदानावर चांदापूर येथील दोन युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडुन लाठ्याकाठ्या , चाकुचा वापर करण्यात आला. अनेकांनी अंदाधुंद दगडफेक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धनराज उमाजी गित्ते यांच्या फिर्यादीवरुन श्रीहरी गित्ते, इंद्रजित गित्ते, गोपाळ गित्ते, सचिन गित्ते, नंद बाजीराव गित्ते, सुधाकर मधुकर गित्ते, रतन मधुकर गित्ते, ज्ञानेश्‍वर बालासाहेब गित्ते, यदु बालासाहेब गित्ते, बाबुराव बंडु गित्ते, मधुकर बाजीराव गित्ते या दहा जणांविरुध्द कलम 323, 324, 325, 147, 143, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये फिर्यादीच्या आई जखमी झाल्या असून त्यांचा दात पडले आहेत. या घटनेमुळे वैजनाथ मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला होता.