
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्ता दुभाजक ओलांडत थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या विरुद्ध लेनवर आला आणि समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक देऊन पलटी झाला. या भीषण अपघातात कंटेनर चालकासह कारमधील एकाचा मृत्यू झाला, तर कारमधील तिघांसह कंटेनरचा क्लिनर गंभीर जखमी झाला. पुणे-मुंबई एक्प्रेस वेवर कामशेत येथे ताजे पेट्रोलपंपासमोर रविवारी (दि. 23) पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामुळे एक्प्रेस वेवरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
कंटेनर चालक अनुराग जगदीश गडवा (रा. चक्कर घट्टा, चंदौली, उत्तर प्रदेश) व कारमधील विवेक सुरेंद्र प्रतापसिंह (30, रा. दर्शननगर, फैजाबाद, उत्तर प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. कंटेनरवरील क्लिनर राहुल राजेंद्र यादव (21, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) याच्यासह कारमधील शुभम शुक्ला (32, रा. खारघर, नवी मुंबई), ऋतुराज परमहंस जयस्वाल (32, रा. तुर्भे, मुंबई), अवधेश यादव (33) अशी चौघा जखमींची नावे आहेत. जखमींना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कामशेत ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी याबाबत माहिती दिली. ड्राय सिमेंट वाहतूक करणारा कंटेनर एक्प्रेस वेवरून पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. कामशेत येथे ताजे पेट्रोल पंपासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्ता दुभाजक तोडून मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या विरुद्ध लेनवर घुसला आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा नेक्सन कारला धडकून पलटी झाला. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. या अपघातामुळे एक्प्रेस वेवरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हलवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.




























































