
जालना जिल्ह्यातील परतूर-वाटुर दिंडीमार्गावर आज सहा वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारने स्कुटीवरून जाणाऱ्या दोघांना पाडळी पुनर्वसनजवळ जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रमेश भाऊराव खंदारे (38), रामभाऊ जगदेव मस्के (रा. पाडळी) हे दोघे मित्र स्कुटी (एमएच 21 बीयू 2226) वर बसून पाडळी वाटुरकडे रस्ता ओलांडून जात असताना येणार्या इनोव्हा कार (एमएच 20 ईई 5889) ने जोराची धडक दिली. या धडकेत दोघे जण रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलीस नाईक नितिन कोकणे, पोको गोविंद पवार, शाम पांढरपोटे यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना परतूर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी संदीप रामभाऊ मस्के यांनी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे कार चालवल्यामुळे कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे करीत आहेत.





























































