
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने शहरापासून जवळच असलेल्या धनेगाव परिसरातील नवीन मुजामपेठ येथे छापा मारुन जवळपास अडीच लाखाची गोवा निर्मित दारु जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक निलेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चिलवंतकर, मुळे यांच्या पथकाने धनेगाव परिसरातील नवीन मुजामपेठ येथे गोदावरी प्लायूड गोदामच्या बाजूला असलेल्या एका घरातून अवैधरित्या विक्रीसाठी आणलेले गोवा निर्मित दारु जप्त केली. यात रॉयल विस्की 141 बॉटल, आयबी 14 बॉक्स, मॅकडॉनल्ड विस्की अडीच बॉक्स असे एकूण जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच ड्राय डेच्या दिवशी जादा दराने विक्री करण्यासाठी गोवा येथून स्वस्तात दारु खरेदी करुन याठिकाणी विक्री करण्यात येते. राज्य उत्पादन शुल्कने आज मोठी कारवाई करुन हा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आरोपी सपुरे हा फरार असल्याचे सांगण्यात आले.



























































