विनाकारण केली तरुणाची हत्या, दोन आरोपी 24 तासांत गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काहीही संबंध नसताना एका तरुणाला कांजुरमार्ग येथे जीव गमवावा लागला होता. दोघा तरुणांनी अचानक त्या तरुणाची चाकूने वार करून हत्या केली होती. गुन्हा करून आरोपी पळाले, परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपास करून 24 तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

कांजुरमार्ग पश्चिमेकडील हुमा मॉलच्या जवळ असलेल्या एका चायनिज रेस्टॉरंटच्या बाजूला रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास निखिल मोरे (26) या तरुणाची छातीवर चाकूने वार करून हत्या झाली होती. घटनेची माहिती मिळताच पार्क साईट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान युनिट-7 च्या प्रभारी निरीक्षक प्रिया थोरात, निरीक्षक जाधव, उबाळे आदींच्या पथकाने संमातर तपास सुरू केला. तेव्हा युनिटचे अंमलदार यांना एक माहिती मिळाली की, रविवारी रात्री दोन तरुण पवईच्या महात्मा फुले नगरात चाकूचा धाक दाखवून घाबरवत होते.

त्यानंतर पथकाने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच हत्या झाली तेथील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही ठिकाणी असलेले तरुण एकच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एकाला पंतनगर तर दुसऱयाला भांडुप येथे ताब्यात घेण्यात आले. दोघांची चौकशी केली असता त्यांनी निखिलच्या हत्येची कबुली दिली. त्यामुळे पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना पार्क साईट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही आरोपी रविवारी रात्री घटनास्थळी असलेल्या इडलीवाल्याकडे गेले होते. तेथे पैशांवरून वाद झाला आणि त्या ठिकाणी उभ्या असलेल्या निखिलवर आरोपींनी हल्ला चढवला. निखिलचा काहीही संबंध नसताना त्याची हत्या करण्यात आली असे प्रत्यक्षदर्शींच म्हणणे आहे.