अकोल्यात एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुली गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरात एका कापड दुकानातून सायंकाळच्या वेळी एक अल्पवयीन मुलगी गायब होण्याची घटना घडली, तर दुसरीकडे राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हरिपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाली आहे. दोन मुली दोन दिवसांत गायब झाल्याच्या घटना घडल्याने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे.

राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावामधील एक मुलगी 31 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त हरिपाठ करण्यासाठी गेली होती. हरिपाठ संपल्यानंतर मंदिरातील सर्व लोक घरी पोहोचले; परंतु मुलगी घरी आली नाही. घरच्यांनी तिचा शोध घेतला; पण ती सापडली नाही. त्यामुळे या मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची शंका तिच्या घरच्यांना आली. त्यामुळे मुलीच्या आजीने राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे अकोले शहरातील एका कापड दुकानात कामाला असलेल्या मुलीला तिच्या घरच्यांनी सकाळी दुकानात सोडले. मुलगी रात्र झाली तरी घरी आली नाही, म्हणून घरच्यांनी कापड दुकानात चौकशी केली. त्या वेळेस मुलगी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुकानातून बाहेर गेल्याचे दुकानमालकाने सांगितले. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला; परंतु मुलगी आढळलेली नाही. त्यामुळे त्या मुलीला कोणीतरी पळून नेले असावे, असा तिच्या नातेवाईकांचा संशय आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.