उरण हादरले, एकाच दिवसात दोन खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चिरनेर

ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत उरण तालुका हादरला आहे. उरण काल दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. एका घटनेत मुलाने बापाचा तर दुसऱ्या घटनेत चिर्ले गावाजवळील दगडाच्या खदाणीत कामगाराचा खून झाला आहे. दोन्ही घटनेतील आरोपी फरार आहेत. पुढील तपास व. पो. नि. निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. डोंगरे हे करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण डाऊर नगर कातकरी वाडी येथील मयत आमीन आदम कुरेशी(54) व त्यांचा मुलगा विष्णू जानु कातकरी(22) यांच्यात घरगुती वाद झाला. त्यावेळी मुलगा विष्णू कातकरी याने वडिलांच्या डोक्यावर लाकडाच्या दांडक्याने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आमीनला नातेवाईकांनी दवाखान्यात दाखल केले. उपचारा दरम्यान आमीनचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून आरोपी विष्णू कातकरी फरार झाला आहे. आरोपी उरण पोलीस स्टेशनमध्ये कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास व. पो. नी. निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत चिर्ले येथील दगड खाणीत काम करीत असलेल्या कामगारांमध्ये आपसात भांडण होऊन त्याचे रूपांतर एकाच्या खुनात झाले. खदाणीत काम करणारे अशोक पटेल, संदीप कुमार, विकास सिंग या कामगारांनी आपला सहकारी कामगार गुलाब अमृत पडघन याच्यावर रात्री 11.30 च्या सुमारास प्राणघात हल्ला करून डोके दगडाने ठेचले. यातच गुलाब यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या विरोधात उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून आरोपी विरोधात कलम 302, 34 गुन्हा दाखल केला आहे.