
सामना प्रतिनिधी । मुंबई
विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड सामन्यावर बेटिंग घेणार्या दोन बुकींना डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली. विश्वास टाकळकर आणि अजय कांतराज अशी या दोघांची नावे आहेत. आतापर्यंत दहा सामन्यांमध्ये 14 कोटी रुपयांचे बेटिंग घेतल्याचे उघड झाले आहे.
सध्या इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेटचे सामने सुरू आहेत. ग्रॅण्ट रोड येथील एका हॉटेलमध्ये काही बुकी बेटिंग घेत असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) अधिकार्यांना मिळाली. पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, शशांक शेळके, सहायक निरीक्षक उमेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक भोसले यांचे पथक तयार केले. पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा मारला. छापा मारून विश्वास आणि अजयला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पोलिसांनी साडेनऊ हजारांची रोकड, 1 लाख 93 हजारांचे 8 मोबाईल, सिमकार्ड, एलईडी टीव्ही जप्त केला. कारवाईदरम्यान पोलिसांना एक वही सापडली त्यात काही पंटरची नावे लिहिली आहेत. अजय हा बंगलोर येथून मुंबईत आला होता. त्या दोघांना पुढील कारवाईकरिता डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. जुगार प्रतिबंधक कायदा आणि टेलिग्राफ कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली. या दोघांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. कोलकाता येथील एका बुकीसह 12 पंटरचा पोलीस शोध घेत आहेत.
दहा सामन्यांवर केले बेटिंग
अजयने काही दिवसांपूर्वी हॉटेलमधील रूम ऑनलाइन बुक केली होती. ते दोघे फोनवरून बेटिंग घ्यायचे. आतापर्यंत 14 कोटी रुपयांचे बेटिंग घेतले आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सामन्यावर 2 कोटी 62 लाख, हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यावर 1 कोटी 60 लाख, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान 1 कोटी 83 लाख, वेस्ट इंडीज-बांगलादेश 2 कोटी 36 लाख रुपयाचे बेटिंग केल्याचे उघड झाले आहे.
























































