
उजनी धरणातून सोलापूरसाठी 6 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. या पाण्यात एक विवाहित महिलेसह लहान मुलगा बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे घडली आहे. या दोघांचेही शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, त्यांचा शोध लागलेला नव्हता. पायल सुग्रीव लोंढे (वय 18), जय दत्ता जाधव (वय 12) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.
पायल ही भीमा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत तिचा भाचा जय हादेखील आला होता. कपडे धुण्यासाठी पायल नदीपात्रात उतरली होती. कपडे धुतल्यानंतर पायल व जय हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही नदीपात्रात बुडाले. याची माहिती मिळताच, पायलचे पती सुग्रीव लोंढे यांनी नदीपात्रात उतरून शोध घेतला. त्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांनाही बोलावून शोध घेतला. मात्र, दोघेही मिळून आले नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच, पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी एक स्पीड बोट मागवून शोधमोहीम राबवली आहे. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. भीमा नदीकाठच्या चिंचोली भोसे, भटुंबरे, शेगाव दुमाला, गोपाळपूर, देगाव, अजनसोड, सुस्ते येथील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांना सतर्क केले असून, लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.






















































