स्किमर काढायला आला आणि तुरुंगात गेला

सामना ऑनलाईन । मुंबई

एटीएममध्ये स्किमर लावून ग्राहकांचा डेटा चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोन नायजेरियनांच्या समतानगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. एटीएममध्ये लावलेला स्किमर काढण्याकरिता आलेल्या नायजेरिनांचा पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करून त्यांना गजाआड केले. साधारण  20 कार्डचा डेटा कॉपी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कांदिवली पूर्व येथे एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये शनिवारी रात्री हर्षद चावडा हे गेले होते. त्यांना तेथे स्किमर आणि छोटा कॅमेरा दिसून आला. त्यांनी याची माहिती समतानगर पोलिसांना कळवली. हर्षद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. अतिरिक्त आयुक्त राजेश प्रधान, परिमंडळ-12 चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुभाष वेळे, वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांच्या पथकातील म्हेत्रे, आंधळे, खरडे, मोरे, सावंत, तोरणे, गळवे, सूर्यवंशी, गवाणे, धोबी, गायकवाड यांनी तपास सुरू केला.पोलिसांनी तपास करून इसाही ओगुनले आणि त्याची मैत्रीण रोझी मॉगीला ताब्यात घेतले. दोघांकडून तीन बनावट डेबिट कार्ड, स्किमर मशीन आणि मायक्रो कॅमेरा जप्त केला आहे. पोलिसांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस बनले सुरक्षा रक्षक

इसाही हा नालासोपारा येथे राहत होता. त्याने शनिवारी सायंकाळी त्या एटीएममध्ये स्किमर बसवले. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने सोबत रोझीला नेले होते. रविवारी पहाटे इसाही स्किमर काढण्याकरिता आला होता. त्याला पकडण्यासाठी दोन पोलीस सुरक्षा रक्षक म्हणून एटीएमजवळ बसले होते. इसाही हा एटीएमजवळ आला. पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.