सोलापुरात दोन रिक्षाचोरांना अटक, 16 रिक्षा हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहर व जिल्हय़ातून रिक्षा चोरून परराज्यात जाऊन विक्री करणाऱया दोघा अट्टल चोरटय़ांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 16 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

सैफ इरफान यादगीर व बिलाल सलिम गदवाल (दोघे रा. गेदुताई परुळेकर विडी घरकुल, कुंभारी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहर व जिल्हय़ात अलीकडील काळात रिक्षा चोरींचे प्रमाण वाढले आहे. या रिक्षा चोरटय़ांचा तपास सुरू असताना संशयावरून कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुलमध्ये राहणाऱया सैफ इरफान यादगीर व बिलाल सलिम गदवाल यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यांच्याकडे चोरीच्या 16 ऍटो रिक्षा आढळल्या. हे दोघेजण चोरलेल्या ऍटोरिक्षा कर्नाटकात नेऊन विक्री करीत असल्याची प्राथमिक माहिती निष्पन्न झाली आहे.

जप्त केलेल्या या 16 रिक्षांत शहरातील पाच व बार्शी, वळसंग, मंद्रुप येथील चोरीस गेलेल्या दहा रिक्षा असून, अन्य सहा रिक्षांची माहिती पोलीस शोधत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.