सामना प्रतिनिधी । गोवा/कोल्हापुर
एटीएम मशीनला स्कीमर बसवून जगभरातील विविध बँकांतील ग्राहकांच्या खात्यावरील ऑनलाईन सिस्टीम हॅक करुन त्यावरुन कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या दोघा रोमानियन परदेशी हॅकर्सना शाहुपूरी पोलिसांनी शिताफीने काल मध्यरात्री अटक केली. गोव्यात यापूर्वी रोमानियन नागरीकांना अशाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रोमानियन नागरिक आता गोमंतकीयांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.
संशयित आरोपी पीरजोल एमनॉईल (वय ४०) आणि सिपोस वासिले लॉर्डियन (वय ३७) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी गोवा राज्यातील पेडणे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दिवसात चार एटीएम मशीनवरुन ऑनलाईनद्वारे रोकड लुटल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. तेथून हे दोघे पोलिसांना चकवा देवून कोल्हापूरला पळून आले होते. येथील एका पंचतारांकित हॉटेलवर उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी आतापर्यंत सात ठिकाणाहून एटीएमद्वारे ग्राहकांचे पैसे परस्पर काढून घेतल्याची कबुली दिली आहे.
यापूर्वी मडगाव,पर्वरी आणि पणजी मध्ये देखील रोमानियन चोरटयांनी एटीएमवर आपला हात साफ केला आहे.
























































