पाचशे, दोन हजारच्या बनावट नोटा वापरणाऱ्यांना सत्र न्यायालयाचा झटका

हिंदुस्थानी चलनात 500 आणि 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांचा वापर करणाऱ्या दोघांना सत्र न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बनावट नोटांची निर्मिती व वितरण करण्याच्या रॅकेटमधील मुख्य आरोपी रिंतू नाझीर हुसैन शेखला 10 वर्षे तुरुंगवास, तर सहआरोपी सिद्धेश्वर कबाडेला 7 वर्षे तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. रिंतू मूळचा पश्चिम बंगालचा असून सिद्धेश्वर हा धाराशीव येथील रहिवाशी आहे.

डिसेंबर 2018 मध्ये मुंबई सीआयडीच्या खंडणीविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे रिंतू शेख व सिद्धेश्वर कबाडेला अटक केली होती. दोघांविरोधात डिसेंबर 2019 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यापुढे हा खटला चालला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील उद्धव तरलगट्टी यांनी भक्कम साक्षी-पुरावे सादर केले. 18 डिसेंबर 2018 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीआयडीच्या खंडणीविरोधी पथकाने दाणा बंदर येथील फूड कॉर्पोरेशनच्या मैदानावर सापळा रचला होता. पश्चिम बंगालचा व्यक्ती बनावट नोटांचा मार्पेटमध्ये वापर करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती सीआयडीला मिळाली होती. याआधारे रिंतूला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे 2 हजारच्या 44 तर पाचशेच्या 34 नोटा आढळल्या. अधिक तपासात सहआरोपी सिद्धेश्वरच्या घरातून 131 बनावट नोटांचे बंडल जप्त केले होते. न्यायालयाने रिंतूला 10 वर्षांचा तुरुंगवास व 10 हजार रुपयांचा दंड तसेच सिद्धेश्वरला 7 वर्षे तुरुंगवास व 5 हजारांचा दंड ठोठावला आहे.

मच्छी खरेदीसाठी गेला अन् जाळय़ात सापडला!

आरोपी रिंतू हा मस्जिद बंदरच्या मच्छी मार्पेटमध्ये मच्छी खरेदीसाठी गेला होता. त्याने मच्छी विव्रेत्याला 2 हजाराची बनावट नोट दिली होती. ती नोट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर मच्छी विव्रेत्याने त्याच्यावर पाळत ठेवली होती. या मच्छी विव्रेत्याची साक्ष खटल्यात महत्वपूर्ण ठरली. रिंतूच्या तुर्भेतील घरातही पाचशे व 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या होत्या.