
नंदुरबार जिह्यातील देवगोई घाटात रविवारी शंभर फूट खोल दरीत स्कूल बस कोसळून भीषण अपघात झाला. यात दोन विद्यार्थी ठार झाले, तर 38 विद्यार्थी जखमी आहेत. नंदुरबार व अक्कलकुवा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील आश्रमशाळेची ही बस आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि मोलगी येथील मुले जळगाव जिह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेतात. दिवाळीची सुट्टी संपल्याने ते रविवारी बसने आश्रमशाळेत जात होते. दुपारी चारच्या सुमारास देवगोई घाटात अमलबारी येथे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस शंभर फूट दरीत कोसळली. या अपघातात जगदीश बहादुरसिंग तडवी हा तेरा वर्षीय मुलगा ठार झाला, तो अक्कलकुवाच्या काठी येथील रहिवाशी आहे. काठीचा राऊतपाडा येथील कपिला जहांगीर राऊत (14) ही मुलगीही मृत्यू पावली. बारा ते चौदा वयोगटातील 20 मुली व 18 मुले असे एकूण 38 विद्यार्थी जखमी असून, त्यांच्यावर नंदुरबार आणि अक्कलकुवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे.



























































