
सामना प्रतिनिधी । मालवण
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक अरूण मारूती वराडकर (६५ रा. घाटकोपर, मुंबई) हे जलतरणपटू रविवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास चिवला बीच समुद्रात अचानक बुडाले. बुडणार्या जलतरणपटूला तातडीने स्थानिक युवकांनी समुद्रातून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान वराडकर यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. वराडकर यांचे नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
शनिवारी सकाळी महिला जलतरणपटू सुरेखा गलांडे स्पर्धेसाठी सराव करताना त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आज दुसर्या जलतरणपटूचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
रविवारी सकाळी चिवला बीच येचे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले अरूण मारूती वराडकर हे चिवला बीच समुद्रात बुडताना निदर्शनास आले. स्पर्धेतील काही मीटर अंतर त्यांनी कापले होते. स्थानिक युवकांनी बोटीतून अरुण वराडकर यांना समुद्रातून बाहेर काढले. फ्रान्सिस फर्नांडीस, संतोष परब, रोहित मेथर, सागर जाधव, वसंत गावकर, निखिल वराडकर यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने वराडकर यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, डॉ. अजित लिमये यांनी वराडकर यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. परंतु उपचारादरम्यान वराडकर यांचा मृत्यू झाला.
पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल पवार, स्वप्नील तांबे यांनी पंचनामा केला. घाटकोपर येथील जलतरणपटूचा ग्रुप जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी मालवणात आला होता. या ग्रुपमध्ये वीस जणांचा समावेश होता. या ग्रुपमधील सदस्यांनी शनिवारी चिवला बीच येथे पोहण्याचा सराव केला. या पोहण्याच्या सरावात अरूण वराडकर हे देखील सहभागी झाले होते.
रविवारी पोहण्याच्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अरूण वराडकर यांनी आपले कपडे ग्रुपथील एका सदस्याकडे दिले होते. ग्रुपमधील अन्य सदस्यही पोहण्याच्या स्पर्धेत सहभागी झाल्याने अरूण वराडकर समुद्रात बुडाल्याची माहिती त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना दुपारनंतर समजली, मात्र घटना समजल्यावर ग्रुपमधील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.



























































