आयपीएलमधील दोन नवे संघ वेटिंगवर;  कोरोनामुळे टेंडर प्रक्रिया लांबणीवर

कोरोनाचा फटका यंदाच्या मोसमातील आयपीएलला बसला आहे. हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट आली आणि आयपीएलचा मोसम अर्धवटच सोडावा लागला. त्यामुळे बीसीसीआयचे कोटय़वधींचे नुकसान झाले. आयपीएलचा अर्धवट राहिलेला मोसम पुन्हा खेळवणे अवघड असतानाच पुढील मोसमाची तयारीही बीसीसीआयला करता येत नाहीए. 2022 सालात आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया यंदाच्या मे महिन्यापासून सुरू होणार होती. पण कोरोनामुळे ही प्रक्रियाही लांबणीवर गेली आहे. आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी पुणे, अहमदाबाद, लखनौ इंदोर ही चार शहरे आघाडीवर आहेत.

पुढील मोसमापासून 5 परदेशी खेळाडूंना संघात स्थान

आयपीएलमधील लढतींचा थरार आणखी वाढावा यासाठी काही सूचना पुढे आल्या आहेत. त्यानुसार एका संघात चारऐवजी पाच परदेशी क्रिकेटपटूंना अंतिम अकरात स्थान देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा यानेही या नव्या संकल्पनेला थम्स दाखवला आहे. आयपीएल ही स्पर्धा हिंदुस्थानातील क्रिकेटपटूंना आपले काwशल्य दाखवता यावे यासाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून या सूचनेला हिरवा कंदील दाखवण्यात येतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चढ्ढा, गोयंका, अदानी, मोहनलाल शर्यतीत

  दोन नव्या संघांसाठी चार शहरांमध्ये रस्सीखेच लागली आहे. त्याचप्रमाणे हे संघ विकत घेण्यासाठीही कमालीची चुरस दिसून येत आहे. अदाणी ग्रुप, गोयंका ग्रुप, चढ्ढा ग्रुप व दक्षिणेतील सिनेस्टार मोहनलाल हे संघ विकत घेण्याच्या शर्यतीत आहेत.

उर्वरीत मोसम आयोजित करणे अवघड

  यंदाच्या आयपीएलचा मोसम अर्धवटच राहिला. यानंतर श्रीलंका, यूएई, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या देशांनी उर्वरीत मोसम आयोजित करण्याची तयारी दाखवली. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे सध्यातरी आयपीएलचा उर्वरीत मोसम आयोजित करणे अवघड असणार आहे.

मेगा लिलाव होणार

  आयपीएलच्या पुढच्या मोसमात दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याआधी क्रिकेटपटूंचा मेगा लिलाव होणार आहे. याप्रसंगी संघ फ्रेंचायझींना पाच खेळाडू रिटेन करण्याची मुभा देण्यात येते. यापैकी तीन खेळाडू सुरुवातीच्या फेऱयांमध्ये तर दोन खेळाडू लिलावादरम्यान ‘राईट टू मॅच’ कार्डद्वारे संघ फ्रेंचायझींना घेता येऊ शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या