बसस्थानक परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद ; पाथर्डीतून दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱया टोळीला जेरबंद करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. पोलीस पथकाने दोन आरोपींना पाथर्डी शहरातून अटक केली.

रोहन बाळ हंडाळ (वय 25, रा. हंडाळवाडी, पाथर्डी, जि. नगर), एकनाथ महादेव मासाळकर (वय 42, रा. विजयनगर, पाथर्डी, जि. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अंशुल नंदकुमार राऊत (वय 27, रा. कांदिवली, मुंबई) या प्रवाशाची 18 जून रोजी नगर शहरातील पुणे बसस्थानक येथून बसमध्ये चढताना 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेली होती. राऊत यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सुरू असताना आरोपी पाथर्डी शहरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी दोन आरोपींना पाथर्डी शहरातून अटक केली आहे. दोघांनी मिळून आणखी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींवर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, शाहीद सलीम शेख, आनंद दाणी, प्रमोद लहारे, सुमीत गवळी, दीपक रोहकले, सोमनाथ केकान, नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.