
भुलाभाई देसाई मार्गावरील शनि मंदिरात दोघा चोरटय़ांनी हातसफाई केली. मोठय़ा शिताफीने चोरांनी मंदिरातील दानपेटी आणि मुकुट घेऊन पोबारा केला. चोरीचा मुद्देमाल लपवून ते टॅक्सीने अॅण्टॉप हिलच्या दिशेने निघाले. पण वडाळा पोलिसांची नाकाबंदी त्यांच्या आडवी आली. नाकाबंदीत पोलिसांनी टॅक्सी थांबवून तपासणी केली असता चोरीचा मामला उघडकीस आला.
सोमवारी मध्यरात्री वडाळा पोलिसांनी फ्रिज वेळ उड्डाणपुलाच्या खाली गोदरेज जंक्शन येथे नाकाबंदी लावली होती. दरम्यान एक टॅक्सी तेथे आली असता नाकाबंदीला असलेल्या पोलिसांनी टॅक्सी थांबवली. आत बसलेले तरुण संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या ताब्यात एक स्टीलची दानपेटी आणि 50 ते 60 ग्रॅम वजनाचा पांढऱ्या रंगाच्या धातूचा त्यावर मणी असलेला मुकुट आढळून आला. त्याबाबत दोघांकडे विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता भुलाभाई देसाई मार्गावरील स्वामिनारायण मंदिराच्या शेजारी असलेल्या शनि मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. रफीउल्ला खान (26) आणि राजू कांबळे (21) अशी त्या दोघांची नावे आहेत.