
सामना प्रतिनिधी । जाफराबाद
जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव देवीच्या यात्रेत डिजेच्या गाडीतून देवीदर्शनास जाताना दोन महिलांचा विजेचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाला असून अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
देऊळगाव उगले येथील मंगलादेवीची यात्रा चैत्रशुध्द पौर्णिमेला दरवर्षी भरत असते. तालुक्यातील एक मोठी यात्रा म्हणून या देवस्थानाकडे पाहिल्या जाते. पोर्णिमेच्या एक दिवस अगोदरच्या रात्री जवळपास ८.३० वाजता विलास शंकर साबळे हा आपल्या आशिर्वाद म्युझिक या डि. जे. गाडीतून आपल्या आई-वडीलांना देवी दर्शनासाठी यात्रेकडे नेत होता. नेमके त्याचवेळी त्यांचे वाहन वीजेच्या मुख्य लाईन खालून जात असतांना त्यांच्या वाहनाला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि वाहनात करंट उतरल्याने अनुसया शंकर साबळे (६५) व तिची १८ वर्षीय नात आश्विनी साबळे दोघी जागेवरच मरण पावल्या. त्यांच्या सोबतच्या शारदा कांबळे (३५) गंभीर जखमी झाल्याने तिला संभाजीनगर येथे हलविण्यात आले. अनुसया या माजी पोलीस पाटील शंकर साबळे यांची पत्नी होत्या.




























































