
सामना प्रतिनिधी । नांदेड
यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील निसर्गनिर्मित धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी आलेले मुगट येथील दोन युवक धबधब्यातून खाली पडूनही नशिबाने बालंबाल बचावले आहेत. असे असले तरी येथ येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला नसल्याने अनेक पर्यटक सेल्फीसाठी धबधब्याजवळ स्टंटबाजी करत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या जून महिन्याच्या सुरुवाती पासूनच हिमायतनगर शहरापासून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या सहस्रकुंडचा खळवळून वाहत आहे. यामुळे येथे पर्यटक युवकांसह हौशी लोकांची तोबा गर्दी होत आहे. असाच धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आलेले मुदखेड तालुक्यातील मौजे मुगट येथील दोन युवक धबधब्याच्या धारेजवळ सेल्फीसाठी गेले होते. अचानक दगडावरून पाय घसरल्याने खाली पडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. थेट पाण्याच्या धारेबरोबर युवक वरून खाली अडले, यावेळी अनेकांनी हे दृश्य पहिले. दैव बलवत्तर म्हणून धारेतून खाली थेट पाण्यात पडल्याने आणि दोघांनाही पोहणे येत असल्याने बालंबाल बचावले आहेत. या घटनेतील युवक बचावले असले तरी येथे पोलीस बंदोबस्त लावला नसल्याने हौशी युवावर्ग थेट नदीपात्राजवळ व कुंडाच्या कडेला आणि कुंडात उतरून स्टंटबाजी करीत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत असल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे.



























































