
व्हॉट्सऍपवर ‘मराठी भाषिक वाघ’ असे स्टेटस ठेवले म्हणून कानडी पोलिसांनी मराठी भाषिक चार तरुणांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बेळगावात समोर आला आहे. तसेच व्हॉट्सऍप आणि फेसबुकवरून मराठी भाषिकांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देणाऱया मराठी भाषिकांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करून दडपशाहीचा प्रयत्न कानडी पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेचे संतप्त पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रात उमटत आहेत.
मराठी भाषिक चळवळीला सीमाभागात सोशल मीडियातूनही बळ मिळत असल्यामुळे कानडी पोलिसांनी याकडे वाकडी नजर केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थनार्थ ‘मराठी भाषिक वाघ’ असे व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवणाऱया बेळगाव जिह्यातील मच्छे गावातील चार तरुणांना शोधून कानडी पोलिसांनी अमानुष मारहाण केली. तरुणांच्या पाठ, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने मारहाण केल्यामुळे तरुणांच्या अंगावर वळ उमटले आहेत.































































