
जगज्जेतेपद राखण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळणाऱया हिंदुस्थानच्या युवा संघाने सुपर सिक्स फेरीत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या सहाव्या सामन्यांत हिंदुस्थानने यजमान झिम्बाब्वेचा तब्बल 204 धावांनी दणदणीत पराभव करत त्यांना नॉकआऊट पंच मारला. त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून हिंदुस्थानने सलग चौथा विजय नोंदवत उपांत्य फेरीच्या दिशेने सुसाट धाव घेतली आहे. रनरेट पाहता हिंदुस्थानचा उपांत्य फेरी प्रवेश जवळजवळ पक्का झाला आहे.
प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानच्या फलंदाजांनी आक्रमकतेचा जबरदस्त नमुना सादर केला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अवघ्या 30 चेंडूंमध्ये 52 धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला झपाटय़ाने सुरुवात करून दिली. त्याने ऍरॉन जॉर्जसोबत पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेसोबत हिंदुस्थानचा डाव अधिक भक्कम केला. मधल्या फळीत थोडी गडबड उडाली असली तरी अभिज्ञान कुंडूने संयमी खेळी करत डाव सावरला. कुंडू आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा यांच्यात झालेली 113 धावांची निर्णायक भागीदारी सामना झिम्बाब्वेच्या आवाक्याबाहेर घेऊन गेली. अखेरीस विहान मल्होत्राने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत नाबाद 109 धावांची शानदार शतकी खेळी साकारली. तळाला आर. एस अंबरीश आणि खिलान पटेल यांनी वेगवान फटकेबाजी करत हिंदुस्थानला 8 बाद 352 या मोठया धावसंख्येपर्यंत नेले.
त्यानंतर पाठलाग करणाऱया झिम्बाब्वेची फलंदाजी हिंदुस्थानच्या गोलंदाजीपुढे पूर्णपणे कोलमडली. झिम्बाब्वेकडून कियान ब्लिगनॉट (37), लिरॉय चिवौला (62) यांनी केलेल्या खेळीमुळे संघाला शंभरी गाठता आली. परिणामी झिम्बाब्वेचा संघ 148 धावांत आटोपला आणि त्यांना 204 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. या विजयामुळे हिंदुस्थान सुपर सिक्स गट दोनमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. आता हिंदुस्थानचा अखेरचा सुपर सिक्स सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात पाकिस्तान जिंकला तरी त्यांचा रनरेट हिंदुस्थानला मागे टाकण्यात अपयशी ठरणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा उपांत्य फेरी प्रवेश निश्चित मानला जात आहे.


























































