
सामना ऑनलाईन, थिरुवनंतपुरम
केरळमध्ये आलेल्या भीषण महापुराने राज्यातील 20 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) दिली आहे. 87 नागरिक जखमी झाले असून 32 जण बेपत्ता आहेत. देश-विदेशातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ वाहत असतानाच संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) केरळ पूरग्रस्त निधीला 700 कोटी रुपयांची तर केंद्राकडून 600 कोटींची मदत घोषित केली आहे.शिवाय पूरग्रस्त मदत सामुग्रीवरील जकात करही माफ केला आहे.
दुबईच्या राजांचे दातृत्व
दुबईचे राजे शेख मोहम्मद बी रशीद अल मक्तुम यांनी यूएईच्या विकासात केरळी जनतेचे मोलाचे योगदान असून संकटाच्या काळात त्यांना मदत करणे हे आमचे परमकर्तव्य आहे, अशी भावना व्यक्त केली. राजे मक्तुम यांच्या या मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे खास आभार मानले आहेत.
हवेत डॉक्टर्स, नर्सेस, कारागीर
राज्याच्या पुनर्वसनासाठी फूड पॅकेट्स, पुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांपासून संरक्षणासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि औषधांची मोठी गरज आहे. शिवाय उध्वस्त झालेली घरे आणि इमारती पुन्हा उभारण्यासाठी कुशल प्लंबर्स, सुतार, इलेक्ट्रिशियन्स आणि गवंडय़ांची गरज आहे. याशिवाय नवे कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचीही मोठी गरज केरळवासीयांना भासत आहे. राज्याच्या या प्रमुख पर्यटन केंद्राचे पुन्हा नवनिर्माण करण्यासाठी देशवासीयांनी उत्स्फूर्त मदत करावी, असे आवाहन केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी केले आहे.
केरळ महापूर इफेक्ट
- पुरात 373 नागरिकांचा मृत्यू; 54.11 लाख नागरिक बेघर
- 40 हजार हेक्टरवरील पिके नष्ट
- 26 हजार घरे पूर्ण उध्वस्त
- 1 लाख किमी लांबीचे रस्ते ,134 पूल उध्वस्त
- पर्यटकांनी केली बुकिंग रद्द
- शेतीचे 600 कोटींचे नुकसान
- कोची विमानतळाचे 220 कोटींचे नुकसान
मध्य रेल्वेकडूनही मदत
मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातून काही रक्कम केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे 90 हजार कर्मचारी असून त्यांच्या ऑगस्ट महिन्यातील वेतनातील काही रक्कम स्वेच्छेने विविध ग्रेडप्रमाणे केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.




























































