
कर्नाटकातील बंगळुरू येथे दोन दिवसांपासून पावसामुळे दाणादाण उडाली. अवकाळी पावसाचा फटका अनेकांना बसला. पावसात घरी पोहोचण्यासाठी ऑनलाईनवरून गाडी बुक करणाऱ्या नागरिकांनासुद्धा याचा जबर फटका बसला आहे. एका वयोवृद्ध व्यक्तीने 12 किलोमीटर दूर जाण्यासाठी उबर बुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु उबरने 12 किमीसाठी तब्बल एक हजार रुपये दाखवले. अडीअडचणींच्या काळात मदत करण्याऐवजी जास्तीचे भाडे आकारणाऱ्या उबरबद्दल या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून 12 किलोमीटरसाठी कोणी एक हजार रुपये भाडे आकारते का? असा सवाल उपस्थित केला आहे. मी माझ्या कुटुंबासोबत पावसात अडकलो होतो. उबर इंडियाला टॅग करून या व्यक्तीने विचारले की, इतकी जास्त किंमत कशासाठी घेत आहेत. मानवता नष्ट झाली का? असेही या व्यक्तीने म्हटले आहे. या व्यक्तीने केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवर अनेक युजर्सने वेगवेगळय़ा कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.