
माणूस कधी कधी इतका खालच्या पातळीवर जातो की मुक्या प्राण्यांवर देखील अत्याचार करायला मागेपुढे बघत नाही. उदयपूरमध्ये एका तरुणाने चक्क कुत्र्याला गाडीच्या मागे बांधून फरफटत नेल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.
बबलू खान असे त्या तरुणाचे नाव असून त्याने रस्त्यावरच्या एका भटक्या कुत्र्याला पकडून त्याच्या गाडीच्या मागे बांधले व फरफटत नेले. या घटनेचा एका तरुणाने व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला. तो व्हिड़ीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्र संघटनांनी याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बबलू खानला अटक केली.
दरम्यान बबलू खान याने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपण जिवंत कुत्र्याला नाही तर मेलेल्या कुत्र्याला गाडीला बांधले होते. ‘त्या कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला होता. त्यामुळे मी त्याला जंगलात नेऊन पुरायचे ठरवले. मेलेल्या कुत्र्याला मी गाडीत ठेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी त्याला गाडीच्या मागे बांधले’, असे बबलू खानने सांगितले.


























































