पाली,,रायपाटण,संगमेश्वर,लांजा आणि मंडणगडातही ऑक्सिजन प्लँट उभारणार -उदय सामंत

महिला रूग्णालय, कळंबणी, कामथे, दापोलीनंतर पाली, रायपाटण, संगमेश्वर, लांजा आणि मंडणगड येथेही ऑक्सिजन प्लँट सुरू करण्यात येणार आहे. तसेच पाच नगरपरिषद क्षेत्रात सेमी विद्युत दाहिनी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

जिल्हा शासकीय रूग्णालयातील ऑक्सिजन प्लँट सुरू झाला असून आणखी पाच ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. त्याचबरोबर 13 रूग्णवाहिकांही लवकरच सेवेत दाखल होतील. त्यामध्ये दोन कार्डिक्ट रूग्णवाहिका असतील असे त्यांनी सांगितले.ॲपेक्स हॉस्पिटलला जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नोटीस बजावली आहे. शासनाने दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांवर उपचार करावेत. त्या प्रोटोकॉलचे पालन झाले नाही तर कारवाई होईल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना उपनेते विजय कदम उपस्थित होते.

लसीकरणासाठी गर्दी करू नये
जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटात एकूण 6 लाख 23 हजार लोकसंख्या आहे. 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक आहे. लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर ज्यांना वेळ आणि तारीख दिली जाईल, त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहावे. अन्य मंडळींनी गर्दी करू नये असे आवाहन सामंत यांनी केले. आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 800 जणांना लस देण्यात आली असून पुढील लस प्राप्त झाल्यानंतर लसीकरण सुरू होईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या