चिपीप्रमाणेच रत्नागिरी विमानतळावरूनही 72 आसनी विमान वाहतूक सुरू होणार – उदय सामंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी विमानतळाचे काम प्रगतीपथावर असून चिपीप्रमाणे रत्नागिरी विमानतळावरून 72 आसनक्षमतेच्या विमानांची वाहतूक सुरू होऊ शकते. त्याचबरोबर रत्नागिरीच्या विमानतळावर नाईट लॅण्डिंगही होणार असून त्याचेही काम सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली आणि येथील कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चिपीच्या विमानतळाप्रमाणेच या विमानतळावर देखील 72 आसनक्षमतेचे विमान सुरक्षितरित्या उतरु शकते, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिल्याचे ते म्हणाले. सध्या हे विमानतळ कोस्टगार्ड रन करीत असल्याने या विमानतळाला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात नाईट लँडीगची सुविधा देखील येथे उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. डोमेस्टीक विमानतळ कधी व कसे सुरु करायचे याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत असून लवकरच रत्नागिरीकरांचे विमानामध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एअर स्ट्रिपचे काम पूर्ण झाले असून कंपाऊंड वॉलचे काम पूर्ण होत आहे. 2100 मीटरची धावपट्टी असून त्यापैकी 1800 मीटरची धावपट्टी वापरात येणार आहे. विमानतळासाठी लागण्याऱ्या भूसंपादनाकरिता 72 कोटी रूपयांचा निधी राज्य सरकार देणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. पंरतु सुरक्षिततेच्या दृष्टीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल, असे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर सामंत यांनी रत्नागिरी येथे सुरू असलेल्या तारांगणाच्या कामाची पाहणी केली. मिनी तारांगण येत्या दोन-तीन महिन्यात सुरू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप,तालुकाप्रमुख प्रदीप साळवी उपस्थित होते.

म्हामूरवाडी ग्रामस्थ पाणी समस्यांबाबत बैठक
उदय सामंत यांना शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे म्हामूरवाडी ग्रामस्थांच्या पाणी समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी येथील ग्रामस्थांची चर्चा केली व समस्या जाणून घेतली. सामंत म्हणाले पाण्यापासून कोणीही वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी. म्हामूरवाडीसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संबधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी व आढवा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, राहूल पंडीत आदि मान्यवंर, संबधित विभागाचे अधिकारी आणि म्हामूरवाडी व साखरतर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

15 एप्रिलपर्यंत तारांगण सुरू होईल
उदय सामंत यांनी रविवारी माळनाका येथील तारांगणाच्या कामाची पहाणी केली. युकेहून पुढील आठवड्यात यंत्रसामुग्री उपल्बध होणार असून महाराष्ट्रातील पहिले मिनी तारांगण 15 एप्रिलपासून सर्वांना पहाण्यासाठी उपलब्ध होईल. पहिलीपासून पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे तारांगण पहाता येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.