हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर भाषा युद्ध निश्चित! उदयनिधी स्टॅलिन यांचा केंद्र सरकारला इशारा

चेन्नईत सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यापैकी एक महत्त्वाचा भाषा सक्तीच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर सरकार त्याचा तीव्र विरोध करेल, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला सुनावले.

चेन्नईतील या कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, जर आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला, आम्ही देखील  भाषेची ही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्ही नेहमीच आमच्या भाषेचे, आमच्या राज्याच्या हक्कांचे, लोकशाहीचे आणि आता लोकांच्या मतदानाच्या अधिकारांचे रक्षण केले आहे, असे ते यावेळी म्हणाले.

तमिळ लोक त्रिभाषिक सूत्र कधीही स्वीकारणार नाहीत. तामिळनाडू नेहमीच आपली भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी उभे राहील. आम्हाला राज्यांना जास्त अधिकार मिळवून देणाऱ्या घटनात्मक सुधारणा हव्या आहेत. जेणेकरून हिंदुस्थान, राज्यांचा एक मजबूत संघ म्हणून काम करू शकेल,” असे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले.

केंद्र सरकार सर्व सत्ता एकत्रित करून त्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी यावेळी त्यांनी केला. भाजप आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचे आणि राजकीयदृष्ट्या मजबूत राज्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे काम करत आहे. देशात हळूहळू सत्ता केंद्रीत होत आहे. ज्यामुळे राज्यांचे अधिकार कमकुवत होत आहेत. निधी रोखणे, नवीन शिक्षण धोरण यासारख्या अनेक मुद्द्यांवर तामिळनाडू समस्यांना तोंड देत असल्याचे त्यांनी सांगितले.