
>>संजय राऊत, महेश मांजरेकर
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाचा उदय झाला आहे. नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सामना’साठी संयुक्त मुलाखत दिली. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत दोन ठाकरे बंधू मराठी आणि मुंबई रक्षणासाठी एकत्र आले व त्यांनी गर्जना केली, ‘‘अभी नहीं तो कभी नहीं. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही दोन भाऊ एकत्र आलोय. मराठी माणसानेही एक व्हायला हवे!’’
राज ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात राज्यकर्ते मराठी असतील, पण त्यांचे मालक दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे काम करीत आहेत. आम्ही हे कारस्थान उधळून लावू.’’ उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, ‘‘आजचे राज्यकर्ते फक्त ठेकेदारांसाठीच काम करीत आहेत. मुळात राज्यकर्त्यांचे प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये. इथे राज्य संपले तरी चालेल, पण ठेकेदारांसाठी सत्ता राबवली जातेय.’’ उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुलाखतीत अक्षरशः घणाघात केला. ‘‘महाराष्ट्र राज्य म्हणजे ‘क्लीन चिट’ देण्याची फॅक्टरी झाली आहे.’’
पूर्वार्ध
मुलाखतीची सुरुवात संजय राऊत व महेश मांजरेकर यांनी केली. एक मुंबईकर व ‘कॉमन मॅन’ म्हणून मांजरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. मांजरेकर हे प्रख्यात सिनेनिर्माता, दिग्दर्शक व कलावंत आहेत. पण त्यांच्यातील अस्वस्थ मुंबईकर मुलाखतीच्या रूपात दिसला.
सुरुवातीलाच ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा विषय आला. संजय राऊत यांनी विचारले, ‘‘महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला. 20 वर्षांनंतर आपण दोघे एकत्र येऊन मुंबई, मराठी माणूस व महाराष्ट्रावर चर्चा करत आहात, पण महाराष्ट्राच्या मनात एक ‘कॉमन प्रश्न’ आहे. दोघांनी त्यावर बोलायला हवे. हा दिवस उजाडण्यासाठी महाराष्ट्राला 20 वर्षे वाट का पहावी लागली?’’
राज ठाकरे – मला असं वाटतं की, काही गोष्टी का घडतात, कशा घडल्या, काय झालं? हे आज आता सोडून दिलं पाहिजे. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे, महाराष्ट्रातील अनेक शहरांवर आहे. हे संकट काय आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे. काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे याची जाणीव त्याला आहे. ही एकच गोष्ट आम्ही एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. या विषयावर अनेक वर्षे मी बोलतोय, उद्धवही बोलतोय. आज अशा एका वळणावर ही निवडणूक आणि महाराष्ट्र उभा आहे, ज्याला आपण ‘अभी नही तो कभी नही’ म्हणतो तशा वळणावर. तशी परिस्थिती मुंबईवर, ठाण्यावर येऊन ठेपलेली आहे. खरं तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपलेली आहे. एमएमआर रिजन मी मुद्दाम बोलतोय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. आज एकत्र नाही आलो आणि आज एकजुटीने सामना नाही केला तर मला असं वाटतं, महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार!
उद्धव ठाकरे – खरं तर, आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा आहे. पण दोन भाऊ एकत्र आले याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला एकजूट दाखवावीच लागेल. पक्ष, राजकीय मतं वेगळी असतील, पण आपण मराठी आहोत. महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकांमध्ये वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील.
संजय राऊत – महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. इतक्या वर्षांनंतरसुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाची उदाहरणं आपण देतो. विशेषतः ठाकरे कुटुंब देतं. तुम्ही दोघेही देता. आता तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेसारखी परिस्थिती जाणवते का? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणूस जसा एकवटला होता, तेच वातावरण आता दिसतंय का?
राज ठाकरे – अर्थातच दिसतंय. तुम्ही बघाल तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्यानंतर सहाएक वर्षांनी माननीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा पुन्हा मराठी माणूस एकवटला होता. त्याला तशी गरज वाटली. आज तेच चित्र दिसतंय.
तेव्हाचे प्रश्न वेगळे होते. आज काय चित्र आहे?
स्थिती गंभीर झालीय. जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येतायत, तेवढे आधी येत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर उत्तरेतून जवळपास रोज 56 ट्रेन्स महाराष्ट्रात येतात. भरून येतायत आणि रिकाम्या जातायत. ठाणे जिल्हा पाहा. हा जगातला एकमेव असा जिल्हा आहे, जिथे 8 ते 9 महानगरपालिका आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली,
यांचा डोलारा फक्त मोदींवर अवलंबून आहे!
भिवंडी, त्यात पालघर जिल्हा वेगळा पकडू नका. वसई-विरार, मीरा-भाईंदर… म्हणजे जवळपास 8-9 महापालिका आहेत. याची सुरुवात होते ग्रामपंचायत, पंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका… लोकसंख्येनुसार हे स्वरूप बदलत जाते. आज मुंबईत एक महानगरपालिका आहे, पुण्यात दोन आहेत. ठाणे जिह्यात 8-9 महानगरपालिका.
याचं कारण काय?
याचं कारण बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय. नुसतं लोकसंख्येचं प्रमाण वाढतंय असं नाही. त्यांची दादागिरी पहा. ‘मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर हिंदू करणार.’ अशी वाक्ये कशी येऊ शकतात? हे कधीपासून सुरू झालं? ही माणसं फक्त रोजीरोटीसाठी येत नाहीएत, हे आपापले मतदारसंघ बनवतायत. तेच चित्र आता दिसतंय. जुनी जखम जी आहे ना, मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं. हे जे स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठी या लोकांचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जसं मुंबई वेगळी करणं, गुजरातनं मागणं असं जे वातावरण होतं, तेच आज आहे. मुंबई वेगळी करणं ही ज्यांची इच्छा आहे तेच केंद्रात आहेत, राज्यातही तेच आहेत आणि महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मला असं वाटतं की, मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे हतबलतेने पाहणं हे आमच्याकडून होणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो.
संजय राऊत – उद्धव साहेब, मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला, पेटला… तेव्हा महाराष्ट्रात परिवर्तन झालेलं आहे. मग सत्ता परिवर्तन असेल, सामाजिक परिवर्तन असेल. आजही त्या पद्धतीने तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का?
उद्धव ठाकरे – एक लक्षात घ्या, मराठी माणूस पेटला तेव्हाच संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळवून दिली. मधला जो काळ होता 60 ते 66. त्या काळात ज्या पद्धतीने, राजने सांगितली तशी परिस्थिती निर्माण झाली होती. मराठी माणूस खचून गेला होता. आत्मविश्वास गमावला होता. त्यावेळी त्याच्यात ताकद, चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. इतकी वर्षे व्यवस्थित चाललं. आपल्याला सगळ्यांना वाटलं, पुढे कोणी हिंमत करणार नाही.
कोणी हिंमत केली?
शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, त्यामागचा हेतू काय आहे? राजकारणात पक्षांतरं होतात. इथली माणसं तिकडे जातात. पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं. त्याची मान्यता जवळपास रद्द करणं. अस्तित्वच नष्ट करणं. मराठी माणसाची ताकद तोडून फोडून काढणं हे काय दर्शवतं? ठीक आहे, राजकारणात युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात. पुन्हा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण पक्ष संपवणं हा कोणता प्रयोग? महाराष्ट्र दुबळा करण्यासाठीच त्यांनी शिवसेना तोडली.
संजय राऊत – संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीसुद्धा लढाई महाराष्ट्रातील मराठी राज्यकर्त्यांच्या विरोधातच होती. आताही राज्यकर्ते मराठीच आहेत. मराठी विरुद्ध मराठी.
उद्धव ठाकरे – मराठी असले तरी त्यांचे मालक जे आहेत दिल्लीत बसलेले, त्यांच्याकडे ते नोकरी करतायत ना… गुलाम लेकाचे!
राज ठाकरे – तुम्हाला एक सांगू का… हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावर बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. इथे मालकाच्या हातावर बसून आपलीच माणसं फोडणं हे आताच्या लोकांचं काम आहे. म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये नाही, राजकीय पक्षांमध्येही तेच चालू आहे. तीच कृती आता सुरू आहे. आपल्याच लोकांकडून ह्या सगळ्या गोष्टी करवून घेतल्या जात आहेत. मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत. मग त्यासाठी जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं, जातीजाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावर बसवणं. त्यातून भांडणं, वाद, मारामाऱ्या करवून महाराष्ट्र मराठी म्हणून एकत्र राहता कामा नये यासाठी त्यांचं सगळं राजकारण सुरू आहे.
संजय राऊत – आपण एकत्र आला आहात, महाराष्ट्राला आनंद झाला. मराठी माणूस एकवटला… पण भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या युतीविषयी म्हणतात, ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. म्हणजे राज ठाकरे हे कन्फ्युज आहेत असं ते म्हणतात आणि उद्धवजींवर त्यांनी करप्शनचा आरोप केला. आपण कन्फ्युज आहात का?
राज ठाकरे – पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा डोलारा हा फक्त नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही त्यांनीच बसवलेली माणसं आहेत सगळी. यातला बसलेला माणूस कोणीच नाही. बसलेला म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचं ऐकतो, मालकाचं ऐकतो. मालक जे सांगेल, त्याप्रमाणं काम करायचं. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही.
करप्शन?
भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत. ते बैलगाडी घेऊन गेले होते ना अजित पवारांच्या विरोधात. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे घेऊन येतोय म्हणून. त्याचं काय झालं? आता म्हणतात की, कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे… कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. या लेव्हलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. या देशात कोणीही राजकारणात सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. सत्ता बदलत असतात. काळ हा सगळ्या गोष्टी बघत असतो. उद्या ज्या दिवशी हे बदलेल, त्यावेळी सगळं बाहेर येणारच आहे. फक्त आपण वाट बघायची.
संजय राऊत – उद्धवजी, तुम्ही सध्या टार्गेटवर आहात. मुख्य लक्ष तुमच्यावर आहे… भाजपमधील ही जी चाटम मंडळी आहे… ज्यांना तुम्ही चाटम म्हणता, त्यांचं टार्गेट तुम्ही आहात.
उद्धव ठाकरे – तुमच्या प्रश्नातच उत्तर आलं ना…
संजय राऊत – अनेक वर्षे आपली सत्ता आहे…
उद्धव ठाकरे – त्या सत्तेत भाजपवालेही सहभागी होते…
संजय राऊत – भाजपनं असा आरोप केलाय की, मुंबई पालिकेत 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेकडे एवढे पैसे असतात? आणि जर एवढे पैसे पालिकेत असतील तर हे आमदार 50-50 कोटींना का पळून गेले?
राज ठाकरे – एक मिनिट… मला त्या गोष्टीबद्दल जरा बोलायचं आहे. ते जे चालू होतं ना पन्नास खोके, पन्नास खोके, पन्नास खोके… मला वाटतं लोकांना नीट समजावून सांगणं गरजेचं आहे. हे पन्नास खोके, पन्नास खोके हा विनोदाचा भाग नाही. पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये झाले… 40 आमदार म्हणजे 2 हजार कोटी झाले… हे पैसे कुठून आले? कसे आले?
संजय राऊत – भ्रष्टाचारातून… घोटाळ्यातून…
राज ठाकरे – बरोबर ना. म्हणजे बँकेतून लोन तर नव्हतं ना घेतलं. त्यामुळे भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं?
महेश मांजरेकर – एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरातून बाहेर पडतो ना, तेव्हा मला लाज वाटते की माझी मुलं या शहरात वाढणार आहेत. काही गोष्टी मी नियमित फॉलो करतो. आजचा एअर क्वॉलिटी इंडेक्स 183 आहे. मला कुणी पर्याय दिला की, कुठं तरी दुसरीकडं जा, तर मी लगेच जाईन. कारण आज मला बाहेर पडल्यावरही त्रास होतो. त्या मुंबईसाठी म्हणून काय करता येईल? एखाद्या फुग्यात त्याच्या क्षमतेपेक्षा पाचपट हवा भरली तर कसं होईल, तशी मुंबईची अवस्था आहे. आज मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 31 लाख आहे. ही मुंबई डिकन्जेस्ट कधी होणार?
उद्धव ठाकरे – मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही इतकी वर्षे मुंबईत राहता. माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे. आज जे प्रदूषण दिसतंय. हवेचा किंवा प्रदूषणाचा जो काही निर्देशांक म्हणतो आपण, हा एवढा खराब कधी झाला होता का? हे विचारण्याचं कारण असं की, आता भाजपवाल्यांनी जी काही विकासाच्या प्रचाराची होर्डिंग्ज लावलीत, ही विकासाची गती नाही. ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकास. हे तुमच्या त्रासाचं कारण आहे. तुम्ही जे म्हणताय ना, आओ जाओ घर तुम्हारा, इथूनच पहिली सुरुवात होते. आपल्याला नेमकं हवंय काय हेच ह्या सरकारला कळलेलं नाही. आज जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडं रस्ते खोदलेत. जिथं जावं तिथं रस्ते खोदलेत, मोठमोठय़ा इमारती उभ्या राहतायत. मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल. हे सगळं हवं आहे यात दुमत नाही. पण एका वेळी ते सगळं काढलेलं आहे. काही तारतम्य असायला पाहिजे. मुंबईच्या खर्चाचाही ताळमेळ बसवला गेला पाहिजे. नाहीतर आतासारखी परिस्थिती ओढवते. मुंबईकर म्हणून तुम्ही जो कर भरता, त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं… प्रदूषण.
विकास, विकास म्हणजे तरी काय? तुमच्याकडं काय छान रस्ता केलाय आम्ही, सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो. ह्याला मी विकास नाही म्हणत. हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं असा विकास पाहिजे.
महेश मांजरेकर – माझं तर म्हणणं आहे की, विकास नको आता.
उद्धव ठाकरे – ही मानसिकता का झाली? कारण नियोजनशून्य विकास. आज आमचीही होर्डिंग्ज लागली आहेत. मी 2012 पासून होर्डिंग्ज लावतो. होय हे आम्ही केलं! त्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला वाटतं मुंबईकरांनाही अभिमान आहे. त्यात शाळेचा दर्जा असेल, पाण्याचा दर्जा असेल. कोस्टल रोड झालेला आहे. हे आम्ही केलेलं आहे. पण वाट्टेल ते केलं नाही. आता हेच बघा ना, मी कलानगरला राहतो. तिकडं वेडेवाकडे उड्डाणपूल दिसतात. आता तिकडं आणखी एक वॉकर ब्रिज केला जातोय. कोणासाठी करतायत, कशासाठी करतायत? सगळे धुळीचे आणि सिमेंटचे कण फुप्फुसात जातायत.
महेश मांजरेकर – मी तेच म्हणतोय, आता विकास करायचीही सोय मुंबईत राहिलेली नाही. मुंबईत कार्बन डायॉक्साइडचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. आपण जो श्वास घेतो, त्यातून
ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन घेतो…
राज ठाकरे – त्याचं मूळ कारण विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत ते आहे. दुसरं म्हणजे मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबईत आपण गेलो तर दिसतं की प्रचंड मोठय़ा प्रमाणावर रिडेव्हलपमेंट सुरू आहे. झाडं तोडतायत. होतं काय की, आपल्याकडं डीपी बनतो, पण टाऊन प्लानिंग होत नाही. 2008-09 ची माझी काही भाषणं आहेत. पुण्यातली माझी ती भाषणं आहेत. मी म्हणालो होतो की, मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला. पुण्याला तो वेळ मिळणार नाही. पुणं लवकरात लवकर बरबाद होईल.
महेश मांजरेकर – मी पुण्याला शिफ्ट झालो होतो, मुंबईत गर्दी झाली म्हणून. पण सहा महिन्यांत परत आलो. मुंबईच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की, जे लोंढे आले आहेत त्यांना राहू द्या, पण येणारे तरी थांबवायला पाहिजेत की…
उद्धव ठाकरे – यात दोन गोष्टी आहेत. मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना, त्या महत्त्वाच्या आहेत. काही बातम्यांची कात्रणं आहेत माझ्याकडं. मुंबईत कांदळवनं आहेत. कांदळवनं साधारणपणे समुद्र आणि खाडी असेल तिथं असतात. मराठीत सांगायचं तर मॅनग्रोव्हज. विकासाच्या नावाखाली हे मॅनग्रोव्हज कापले जातायत. आता साधारणतः कायदा असा आहे की, जेवढी झाडं तुम्ही तोडाल, तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत. मुंबईची मॅनग्रोव्हज जी समुद्रकिनारी आहेत, ती कापल्यानंतर कुठं लावली पाहिजेत. तुम्ही पुण्याला गेला असाल, चंद्रपूरला गेलात का? तिथं जाऊन बघा. मुंबईतील कांदळवनाची भरपाई हे चंद्रपूरला करत आहेत. ह्या विकासाचा काय उपयोग होणार? तुम्ही 2017 चा माझा मुंबईचा वचननामा पाहिलात तर तुम्हाला दिसेल की मुंबईला पाण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणं बांधण्याचं वचन मी दिलं होतं. कर्मधर्मसंयोगानं मी मुख्यमंत्री झालो, दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून या धरणांसाठी प्रेझेंटेशन घेतलं. तेव्हा एक धक्कादायक गोष्ट माझ्या लक्षात आली की, ही धरणं बांधायची असतील तर जवळपास 6 लाख झाडं कापावी लागतील. म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करावं लागणार. साधारणतः जिथं पॅचमेंट एरिया असतो, तिथं पाऊस पडतो, तो एरिया नष्ट होणार. म्हणजे पर्यावरण खतम होणार. त्यासाठी खर्च होणार. शिवाय पुन्हा आपल्याला पावसावर अवलंबून राहावं लागणार. तेही पाणी उद्या कमी पडणार, कारण दुसऱ्या बाजूनं लोंढे येतच राहणार. त्याला पर्याय म्हणून समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना एका पायलट प्रोजेक्टला ‘गो अहेड’ दिला होता. तो प्रोजेक्ट कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता. त्यातून आज तानसातून दरदिवशी जेवढं पाणी मिळतं, 400 एमएलडी, तेवढं पाणी मुंबईकरांना मिळालं असतं. या सरकारनं तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉण्ट्रक्टरसाठी परत एकदा गारगाई पिंजाळला हात घातला. ‘आरे’च्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं. मेट्रो मला नको होती असं नाही, मीही मेट्रोचं लोकार्पण केलंच होतं ना. मेट्रो दोनचं. आमच्या सरकारचं म्हणणं होतं की कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही. कांजूरमार्गला कारशेड होऊ शकते. तेव्हा माझ्यावर टीका केली. आता ह्या सरकारनं काय केलं. हट्टापायी ‘आरे’चं जंगल मारलंच, प्लस कांजूरचीही जागा वापरतायत. कशासाठी करताय हे?
महेश मांजरेकर – आज मुंबईत ज्या नवीन बिल्डिंग होतात, तिकडं 24 तास पाणी असतं. माझ्या छोटय़ा बिल्डिंगला 2 तास आणि 3 तास. बाहेर पडलो तर जिथं दहा मिनिटं लागत होती, तिथं मला एक तास लागतो. यात गर्दीचा मुद्दा येतो. आता मुंबई डिकन्जेस्ट करण्याची गरज आहे. माझं असं म्हणणं आहे की आलेत ते राहू द्या, ते आता मुंबईकर झालेत. पण आता जागा नाही हेही समजवायला पाहिजे… 51 लाख गाड्या झाल्यात मुंबईत.
राज ठाकरे – मला असं वाटतं की, काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता, राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. काय आहे की, चार प्रकारच्या जागा असतात. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खासगी जागा असते. मुंबईत गोदरेजची खासगी जागा आहे. तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही, पण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या, या ज्या सगळ्या जागा आहेत, याला आईबापच नाही. आज कित्येक वेळेला अशा अनधिकृत गोष्टी पाडल्या गेल्या, पण मूळ प्रश्न कायम… यावर ज्या प्रकारचा वचक पाहिजे, तो वचक येणं गरजेचं आहे. तो कोणीही आणावा. आम्ही सत्तेत आलो तर आम्ही आणू, राज्यातील लोकांनी आणावा, पण वचक हवा. तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की, जागा संपलेली आहे. आता साधी गोष्ट घ्या प्रदूषणाची. मुंबईत हालत आहे मला मान्य, पण दिल्लीतली हालत काय आहे? आज दिल्लीत बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही प्रशासकीय यंत्रणा तिकडं आहेत.
उद्धव ठाकरे – मुळात राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये. सत्तेसाठी वाट्टेल ते करायचं आणि बट्टय़ाबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, आपण मुंबईत राहणारे आहोत. दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत. जरी मराठी असले, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांचं किंवा त्यांच्या शहराचं काही पडलंय का? ते फक्त
कॉण्ट्रक्टरसाठी काम करतात.
संजय राऊत – इथे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक तर आता राजसाहेबांनी जो मुद्दा सांगितला, जमीन केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, खासगी आहे. पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनीचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे. जवळजवळ तोच मालक आहे. एकच! एकेकाळी महाराष्ट्रात, देशात विनोबा भावेंनी घोषणा दिली होती की, सब भूमी गोपाल की…! आज सब भूमी अदानी की झालीय. मुंबई वाचवायची असेल तर हे जे मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम सुरू आहे, एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे… ते थांबवावं लागेल. जो मुद्दा आपण वचननाम्यातसुद्धा घेतलाय, हे आपण कसं करणार?
उद्धव ठाकरे – आज त्यांना अडवणारं कोणी प्रशासनात नाहीच आहे. केंद्रातनं ऑर्डर आली की घाला जमीन त्यांच्या घशात. ते बोट ठेवतील ती जमीन आणि कॉण्ट्रक्ट त्यांना मिळते… जसं मघाशी राज म्हणाला की, हे ससाणे बसलेले आहेत. ते जागा दाखवतात आणि ती घेऊन घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका हे शेवटचं ठिकाण राहिलं आहे, जिकडे ठामपणे त्यांना नाही सांगणारं कोणीतरी पाहिजे.
विकासाची नाही, विनाशाची गती आहे!
संजय राऊत – माझा तोच मुद्दा आहे की, आपण म्हणतो महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे. मराठी माणसाची सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावर प्रश्न संपतील का? ज्या प्रश्नासाठी आपण आता उभे राहिलो आहोत. आपण एकत्र आला आहात आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे अदानी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून…
राज ठाकरे – मी याच्याबद्दल एक सांगतो… मला असं वाटतं, मुंबई महापालिकेची मुदत संपली 2022 ला. त्याच वेळी मला वाटतं बहुतेक उद्धव सरकार गेलं.
उद्धव ठाकरे – नाही… त्याआधी महापालिका विसर्जित झाली होती. जूनमध्ये माझं सरकार पाडलं…
राज ठाकरे – म्हणजे 2022 नंतर आज जानेवारी 2026 मध्ये निवडणूक होतेय. इतकी वर्षे का गेली? माझ्या पुढच्या काही भाषणांमध्ये किंवा इंटरह्यूमधनं मी हे नीट सांगणार आहे, की ह्यांचं काय प्लानिंग चालू होतं. आणि 24 ते 25 या काळात काय झालं? एका वर्षात काय झालं? हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. हे काय प्रकारचं प्लानिंग होतं? कशासाठी ह्या निवडणुका ढकलत ढकलत आज 26 पर्यंत आल्यात. ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर.
संजय राऊत – म्हणजे हे एका दबावाखाली सुरू आहे.
मी मघाशी म्हटलं ना, ही माणसं जी आहेत ना, ती बसवलेली माणसं आहेत. आणि हे जागा दाखवत नाहीत. ते जागा पाहतात. ह्यांच्याकडं सह्यांसाठी फक्त फायली येतात आणि सांगितलं जातं की, याच्यावर सही कर. आपल्याच लोकांना, इकडच्या मराठी लोकांना समजत नाही आहे की, आपण काय करतो आहोत. हे त्यांना कालांतरानं समजेल की आपण काय घोडचुका केल्यात.
संजय राऊत – त्यांनी महाराष्ट्राचं ‘डेथ वॉरंट’ काढलंय. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय!
राज ठाकरे – होय. नक्कीच आणि ह्यात कसं आहे की, देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे. एक उदाहरण म्हणून सांगतो. मी एकदा स्वीत्झर्लंडला गेलो होतो. तिथे मी तो देश पाहत होतो. गाड्या फिरतायत, सगळ्यांकडं उत्तम नोकऱ्या आहेत, सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे. सगळं सगळं व्यवस्थित छान. हे सगळं पाहताना माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर काय सांगत असेल, की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन… त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघता, शहर बघता ना, तुम्हाला समजणारच नाहीत की तिथले प्रश्न काय आहेत ते? उदाहरणार्थ समजा, तुमचा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी हे जेव्हा बाहेरचे असतात, ते जेव्हा मुंबईत येतात, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की, साला प्रॉब्लेम काय आहे या शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटलं आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कम्पॅरिजन करतो त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे त्यावर सगळं अवलंबून आहे.
महेश मांजरेकर – आई भीक मागू देत नाही, वडील चोरी करू देत नाहीत… अशी परिस्थिती मुंबईतील मध्यमवर्गाची आहे. त्याचं काय? फुटपाथ नाहीत, चालणार कुठे? शाळांचे प्रॉब्लेम आहेत. फक्त श्रीमंतांना शिक्षण घ्यायचा अधिकार आहे का? महापालिका शाळाही एसी झाल्या पाहिजेत.
उद्धव ठाकरे – वस्तुस्थिती तशी नाही. मी याबद्दल ठामपणे सांगू शकेन. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा जेवढय़ा आपण सुधरवल्या, तेवढय़ा कदाचित फक्त अरविंद केजरीवालने दिल्लीत सुधरवल्या असतील. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यायला लोकांची रांग लागली. ह्याचं कारण आपण शिक्षणाचा दर्जा उंचावला. हा, इमारती अजून सुधरवायला पाहिजेत. कारण शेवटी बजेटचा विषय असतो.
महेश मांजरेकर – माझं म्हणणं आहे की, म्युनिसिपाल्टीच्या शाळेत मी जातो हे सांगायला कोणाला लाज वाटता कामा नये…
उद्धव ठाकरे – नाही वाटणार, अभिमान वाटेल. अगदी एअर कंडिशन्ड शाळा नाहीत, पण देशात मुंबई महापालिका एकमेव असेल, जिने 2010 पासून अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा वापरण्यास सुरुवात केली. व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना सुरू केली. म्हणजे आम्ही काय केलं की, साधारणतः एका विषयातील चांगला शिक्षक किंवा शिक्षिका दहावीच्या विद्यार्थ्यांना एकाच स्टुडियोतून शिकवतील अशी सोय केली. हे शिकवणं म्हणजे ‘मन की बात’ नाही, प्रश्नोत्तरं होतात. म्हणजे प्रश्न असतील तर विद्यार्थी ते विचारू शकतात आणि शिक्षक उत्तरं देऊ शकतात. याची आम्ही एक पुस्तिकाच केलेली आहे. महापालिकेच्या जवळपास 1300 शाळा मुंबईत आहेत. त्यात जवळपास साडेतीन लाख विद्यार्थी वेगवेगळ्या आठ भाषांतून शिक्षण घेतात. मराठी तर आलीच, इंग्रजी, सेमी इंग्रजी, हिंदी, ऊर्दू, गुजराती अशा आठ भाषांमध्ये शिक्षण देतो. त्यानंतर 2014-15 च्या सुमारास आम्ही आठवी ते दहावी ई-लर्निंग ही संकल्पना आणली. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करायचं शिवसेनाप्रमुखांचं जे स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक गोष्टी ई-सीममध्ये आणल्या. ते टॅबमध्ये टाकून द्यायला लागलो. यातल्या बऱ्याच गोष्टी ऑनिमेटेड होत्या. मुलांना पटकन समजायचं. एखादी गोष्ट आपण दाखवू शकत नाही. चंद्रावरचं वातावरण कसं असेल अशा काही गोष्टी आपण प्रत्यक्षात दाखवू शकत नाही. ते ऑनिमेशनच्या द्वारे दाखवण्यात आलं आणि शिकवण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की, महानगरपालिकेच्या शाळांचा रिझल्ट जवळपास 100 टक्क्यांच्या जवळ आला. पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळांमध्ये अॅडमिशन पाहिजे म्हणून चिठ्ठय़ा मागायला लोक यायला लागले. एसएससी, सीबीएसई, आयसीएसई हे सगळे अभ्यासक्रम आपण महापालिकेच्या शाळेत आणले.
संजय राऊत – माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातील काही शाळा गौतम अदानींना दिल्यात. मुंबईपर्यंत हे लोण आलंय की नाही माहीत नाही. चंद्रपूर, गडचिरोलीत ते झालंय… आपलं महाराष्ट्राचं शिक्षण खातं इतकं सक्षम नाही…
उद्धव ठाकरे – गेल्या चार वर्षांत ह्या सगळ्या गोष्टी जास्त सुरू झाल्या. चंद्रपूरमध्ये एक शाळा दिली त्यांना. मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता येणार नाही म्हणा, पण ते खासगीकरण करू शकतात. हॉस्पिटलचं खासगीकरणही आपण रोखलेलं आहे.
संजय राऊत – उद्धवसाहेब, सध्या ‘धुरंधर’चा माहौल आहे. लोकं ‘धुरंधर’वर चर्चा करतायत. मुंबईत रहमान डकैत कोण आहे, ‘धुरंधर’ कोण आहे… आपण दोघेही राज्याच्या राजकारणातले धुरंधर आहात…
उद्धव ठाकरे – पाब्लो एस्को बारही शोधला पाहिजे…ते महत्त्वाचं आहे.
संजय राऊत – त्यालाच जोडून माझा प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये अमली पदार्थ, विविध प्रकारचं ड्रग्ज सहज उपलब्ध आहे. ठाण्यात नुकतंच साडेपाच कोटींचं मँड्रेक्स पकडलं. साताऱ्यात ड्रग्जची फॅक्टरी डेप्युटी सीएमच्या दारात पकडली. मुंबईत काल पावणे तीन कोटीचं ड्रग्ज पकडलं, हे चित्र या महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं. हे सगळं ड्रग्ज गुजरातच्या मार्गे मुंद्रा पोर्ट, जे अदानींच्या मालकीचं आहे, तिथून येतंय. हे चित्र गंभीर नाही का?
राज ठाकरे – या सगळ्या गोष्टींचा महानगरपालिकेशी काही संबंध नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ह्याला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. ड्रग्जच्या विरोधातल्या धाडी गेल्या दहा वर्षांत बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत, मुलांपर्यंत हा प्रकार येऊ लागलाय. ह्या सगळ्याचं नीट
अॅनालिसिस केलं तर राजकारणात वाढलेला पैसा आणि रस्त्यावर आलेला ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे, तो मला असं वाटतं जुळवून पाहिला पाहिजे. निवडणुकांवर खर्च आणि सगळ्या गोष्टी राजकारणात ज्या प्रकारे होतायत, ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावर येतायत, त्यावर कुठल्याही प्रकारच्या धाडी पडत नाहीत, त्यावर बंधनं येत नाहीत हे केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे.
संजय राऊत – आपण महाराष्ट्राच्या राजधानीवर मुंबईवर बोलतोय, आपण ठाण्यावर बोलतोय, नाशिकवर बोलतोय. त्यामुळं लोकांचा असा प्रश्न आहे की, महाराष्ट्र खूप मोठा आहे. फक्त मुंबईच का? आमच्याकडंही पाहा, अशी या शहरांची हाक आहे.
राज ठाकरे – अर्थातच ना, पण या सगळ्या गोष्टी पाहणारी डिपार्टमेंट्स आहेत. मला असं वाटतं, राज्य सरकारनं ह्याची उत्तरं दिली पाहिजेत.
उद्धव ठाकरे – ऊठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना ‘क्लीन चिट’ देत सुटलेत. साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती ड्रग्जची फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तरी सांगा.
संजय राऊत – तिथंही क्लीन चिट दिली ना…
उद्धव ठाकरे – आमच्यावर आरोप करतायत ते. त्यांना तेवढंच करता येतं म्हणा… पण तुमच्या बुडाशी काय जळतंय ते कधी तरी बघा ना! ते बूड जळून खाक झाल्यानंतर बघून काय उपयोग? त्या ड्रग्ज प्रकरणात इनव्हॉल्व असलेले लोक त्यांच्या आजूबाजूला अंगतपंगत करत बसलेत का… हे तरी बघा!
संजय राऊत – आपण पाहतोय की, राजकारणाचं ज्या पद्धतीने गुन्हेगारीकरण झालंय, खुलेआम…
राज ठाकरे – गुन्हेगारीकरणपेक्षा त्याला चांगला शब्द म्हणजे विद्रुपीकरण…
संजय राऊत – मी मघाशी ‘धुरंधर’चा उल्लेख केला. त्यात कराचीमधलं एक लॅरी शहर दाखवलंय. ज्या पद्धतीनं लॅरी शहरातल्या माफियांची मोडस
ऑपरेंडी होती त्याच पद्धतीनं मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी–चिंचवड, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये कारभार चालला आहे.
राज ठाकरे – तुम्ही प्रमुख शहरं घेऊच नका. तुम्ही मराठवाड्यात जा. पश्चिम महाराष्ट्रात जा, तुम्ही विदर्भात जा आणि जी छोटी-छोटी शहरं उभी राहतायत ना, तिकडची परिस्थिती बघा. अत्यंत गंभीर चित्र आहे.
संजय राऊत – बीड तर आहेच. ज्याला आपण गुन्हेगारीचा ‘बीड पॅटर्न’ म्हणतो…
उद्धव ठाकरे – सगळीच अनागोंदी सुरू आहे. म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की, आपल्या देशाला पंतप्रधान पाहिजे. देशाला पंतप्रधान नाही, भाजपला पंतप्रधान आहे. तसंच महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाही, जो आहे तो भाजपचा आहे. हे सगळे जण त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढंच घेऊन बसलेत. सत्तांध झालेत. लोक मेले तरी चालतील, नागरिक मेले तरी चालतील. त्यांची मुलंबाळं ड्रग्जच्या आहारी गेली तरी चालतील. ड्रग्जचे धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आम्हाला सत्ता पाहिजे. ही जी काही वृत्ती आहे, ती घातक आहे.
संजय राऊत – यावर आपण काय करणार? आपल्याकडं कायदा–सुव्यवस्थेचं खातं नाही. आपल्याकडं सरकार नाही. पण आपल्याकडं जनसंघटन आहे ना…
उद्धव ठाकरे – सांगतो ना… याच्यासाठी शेवटी काय आहे, जसं राज म्हणाला तसं, सत्ता हातात असणं गरजेचं आहे. जेणेकरून कायदेशीर बंधनं आणता येतील. उद्या जाऊन आपण तिकडं धाड टाकली. तिथं यांचेच बगलबच्चे निघाले तर काय होणार? नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी मालवण वगैरे त्या भागात त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांच्या दुसऱ्या पक्षावर धाड टाकली. काय मिळवलं? पैसे दिसले, पुढं काय झालं? क्लीन चिट. उपयोग काय?
राज ठाकरे – काय आहे ना… या सगळ्या गोष्टींना कुठंतरी बंधनं घालण्याची सुरुवात होण्यासाठी या महानगरपालिका खूप महत्त्वाच्या आहेत. जे सगळं आता महाराष्ट्रात चालू आहे, त्यावर लोकांनी त्यांचा राग व्यक्त करणं गरजेचं आहे. ही सत्ता आमच्यासाठी नको आहे, परंतु ज्या काही गोष्टी होतायत यावर बंधनं आणायची असतील, त्याला सुरुवात करायची असेल तर मला असं वाटतं महानगरपालिका ही आताची गरज आहे. खासकरून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर इतर सगळ्या महापालिका, इथं लोकांनी आता राग व्यक्त करणं गरजेचं आहे. लोकांकडून जर पुन्हा याच सत्ताधाऱ्यांना मतदान होत असेल… पैसे देऊन माघार वगैरे तूर्त बाजूला ठेवू, पण लोकांनी मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर आपण म्हणतो ना, राजानं मारलं काय, पावसानं झोडलं काय, तक्रार कुणाकडं करायची? तशी गत होईल.
संजय राऊत – तुमच्याकडं करणार तक्रार…
राज ठाकरे – म्हणजे आमच्याकडं फक्त तक्रार, मतं नाहीत. असं थोडी होतं.
उद्धव ठाकरे – आता उमेदवार धडाधड माघार घेतायत… त्यांना माघार घ्यायला भाग पाडले जातेय. यापुढची परिस्थिती कदाचित अशी होईल, जसा अमेरिकेने व्हेनेझुएलाचा अध्यक्ष उचलून नेला तसे आता नगराध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील सुरतेला. आपले मंत्री, आमदार नेलेच ना त्यांनी. आपले मंत्री जसे उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले. ट्रम्पने तेच केलं. सुरुवात महाराष्ट्रातून झालीय.
संजय राऊत – व्हेनेझुएला देशाची लोकसंख्या 2 कोटी 30 लाख आहे आणि मुंबईची लोकसंख्या सुद्धा 2 कोटी 31 लाख आहे. दोन्हीकडचे प्रश्न तसेच आहेत. कोणत्याही प्रकारचा विकास नाही. ड्रग्ज तेवढंच आहे. गुन्हेगारी आहे. मग इथून कोणाला उचलायचं?
उद्धव ठाकरे – जे करतात त्यांना उचललंच पाहिजे. त्यांना तुम्ही चोंबाळत बसलात, सत्ता पाहिजे म्हणून. तर सत्यानाश त्यांचाही होणार आहे. जे चोंबाळत आहेत त्यांचा म्हणतोय मी.
महेश मांजरेकर – आपण प्रत्येक वेळी म्हणतो, मतदान माझा हक्क आहे. पण मग आता जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी मतदारांनी बोटावरचं काळं कसं दाखवायचं? म्हणजे माझा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून घेताय ना? हा पायंडा प्रत्येक ठिकाणी पडता कामा नये. अशा ठिकाणी 30 टक्के लोकांनी म्हटलं की, हा आम्हाला नको तर त्याला बाद केलं पाहिजे.
राज ठाकरे – काय आहे की, व्होटिंग पॅडवर ‘नोटा’चा अधिकार आहे. पण त्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे.
उद्धव ठाकरे – वाटलेल्या नोटांमुळे झालेला हा
प्रॉब्लेम आहे.
महेश मांजरेकर – जे बिनविरोध आलेत तिथं नोटा दाबायलाही चान्स नाही…
राज ठाकरे – एक्झॅक्टली! कारण नोटा मिळाल्या ना…
उद्धव ठाकरे – यावर उपाय म्हणजे जसं एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि त्यात काही गफलत वाटली तर री-टेंडर काढलं जातं. तसंच तिथली निवडणूक प्रक्रिया नव्यानं घेतली पाहिजे. पण निवडणूक आयोगानं काय केलं? निकाल थांबवलाय, तो सर्व निकालाबरोबर जाहीर करणार, कारण आयोग त्यांचा गुलाम आहे. बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकही उमदेवार नाही? पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही? हा काय योगायोग आहे की काय आहे?
‘जेन-झी’ हा एक शब्द आता सगळीकडं दरारा निर्माण करणारा झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जेन झी जे पहिल्यांदा मतदान करणार होते, ते बिनविरोधमुळं खूप अस्वस्थ आहेत. त्यांच्या डोक्यात जी आग आहे, ती बाहेर आली तर मग ह्यांची हालत खराब होणार आहे.
संजय राऊत – उद्धव साहेब, तुम्ही जेन झीचा उल्लेख करताय, पण नेपाळ असेल, बांगलादेश असेल, अन्य राष्ट्रांमध्ये डोक्यात राग आणि आग असलेला जेन–झी हा खरोखर रस्त्यावर उतरला… आपल्याकडचा जेन–झी एका विशिष्ट विचारसरणीचा गुलाम झालेला दिसतोय, हा जेन–झी तुमच्याकडं अपेक्षेनं पाहतोय.
राज ठाकरे – मला एवढंच वाटतं की, ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे. मला खरंच प्रश्न पडतो, देवी-देवता आहेत का? आणि आहेत तर ते हे फक्त का बघत बसलेत?
संजय राऊत – 33 कोटी…
राज ठाकरे – एवढे जर ते आहेत तर ते ह्या सगळ्या गोष्टी का बघत बसलेत!
(क्रमशः)
शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, त्यामागचा हेतू काय आहे? राजकारणात पक्षांतरं होतात. इथली माणसं तिकडे जातात. पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं. त्याची मान्यता जवळपास रद्द करणं. अस्तित्वच नष्ट करणं. मराठी माणसाची ताकद तोडून फोडून काढणं हे काय दर्शवतं? ठीक आहे, राजकारणात युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात. पुन्हा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण पक्ष संपवणं हा कोणता प्रयोग? महाराष्ट्र दुबळा करण्यासाठीच त्यांनी शिवसेना तोडली. – उद्धव ठाकरे
एक लक्षात घ्या, मराठी माणूस पेटला तेव्हाच संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळवून दिली. मराठी माणूस खचून गेला होता. आत्मविश्वास गमावला होता. त्यावेळी त्याच्यात ताकद, चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. इतकी वर्षे व्यवस्थित चाललं. – उद्धव ठाकरे
बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय. नुसतं लोकसंख्येचं प्रमाण वाढतंय असं नाही. त्यांची दादागिरी पहा. ‘मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर हिंदू करणार.’ अशी वाक्ये कशी येऊ शकतात? हे कधीपासून सुरू झालं? ही माणसं फक्त रोजीरोटीसाठी येत नाहीएत, हे आपापले मतदारसंघ बनवतायत. – राज ठाकरे
जुनी जखम जी आहे ना, मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं. हे जे स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठी या लोकांचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जसं मुंबई वेगळी करणं, गुजरातनं मागणं असं जे वातावरण होतं, तेच आज आहे. मुंबई वेगळी करणं ही ज्यांची इच्छा आहे तेच केंद्रात आहेत, राज्यातही तेच आहेत आणि महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मला असं वाटतं की, मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे हतबलतेने पाहणं हे आमच्याकडून होणार नाही, म्हणून आम्ही एकत्र आलो. – राज ठाकरे
विकासाच्या नावाखाली हे मॅनग्रोव्हज कापले जातायत. आता साधारणतः कायदा असा आहे की, जेवढी झाडं तुम्ही तोडाल, तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत. मुंबईची मॅनग्रोव्हज जी समुद्रकिनारी आहेत, ती कापल्यानंतर कुठं लावली पाहिजेत. तुम्ही पुण्याला गेला असाल, चंद्रपूरला गेलात का? तिथं जाऊन बघा. मुंबईतील कांदळवनाची भरपाई हे चंद्रपूरला करत आहेत. ह्या विकासाचा काय उपयोग होणार? – उद्धव ठाकरे
2022 नंतर आज जानेवारी 2026 मध्ये निवडणूक होतेय. इतकी वर्षे का गेली? माझ्या पुढच्या काही भाषणांमध्ये किंवा इंटरह्यूमधनं मी हे नीट सांगणार आहे, की ह्यांचं काय प्लानिंग चालू होतं. आणि 24 ते 25 या काळात काय झालं? एका वर्षात काय झालं? हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. हे काय प्रकारचं प्लानिंग होतं? कशासाठी ह्या निवडणुका ढकलत ढकलत आज 26 पर्यंत आल्यात. ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. – राज ठाकरे
‘आरे’च्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं. मेट्रो मला नको होती असं नाही, मीही मेट्रोचं लोकार्पण केलंच होतं ना. मेट्रो दोनचं. आमच्या सरकारचं म्हणणं होतं की कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही. कांजूरमार्गला कारशेड होऊ शकते. तेव्हा माझ्यावर टीका केली. आता ह्या सरकारनं काय केलं. हट्टापायी ‘आरे’चं जंगल मारलंच, प्लस कांजूरचीही जागा वापरतायत. कशासाठी करताय हे? – उद्धव ठाकरे
मी मघाशी म्हटलं ना, ही माणसं जी आहेत ना, ती बसवलेली माणसं आहेत. आणि हे जागा दाखवत नाहीत. ते जागा पाहतात. ह्यांच्याकडं सह्यांसाठी फक्त फायली येतात आणि सांगितलं जातं की, याच्यावर सही कर. आपल्याच लोकांना, इकडच्या मराठी लोकांना समजत नाही आहे की, आपण काय करतो आहोत. हे त्यांना कालांतरानं समजेल की आपण काय घोडचुका केल्यात. – राज ठाकरे
तुम्हाला एक सांगू का… हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावर बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. इथे मालकाच्या हातावर बसून आपलीच माणसं फोडणं हे आताच्या लोकांचं काम आहे. म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये नाही, राजकीय पक्षांमध्येही तेच चालू आहे. – राज ठाकरे
मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत. मग त्यासाठी जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं, जातीजाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावर बसवणं. त्यातून भांडणं, वाद, मारामाऱ्या करवून महाराष्ट्र मराठी म्हणून एकत्र राहता कामा नये यासाठी त्यांचं सगळं राजकारण सुरू आहे. – राज ठाकरे
आज त्यांना अडवणारं कोणी प्रशासनात नाहीच आहे. केंद्रातनं ऑर्डर आली की घाला जमीन त्यांच्या घशात. ते बोट ठेवतील ती जमीन आणि कॉण्ट्रक्ट त्यांना मिळते… जसं मघाशी राज म्हणाला की, हे ससाणे बसलेले आहेत. ते जागा दाखवतात आणि ती घेऊन घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका हे शेवटचं ठिकाण राहिलं आहे, जिकडे ठामपणे त्यांना नाही सांगणारं कोणीतरी पाहिजे. – उद्धव ठाकरे
जसं एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि त्यात काही गफलत वाटली तर री–टेंडर काढलं जातं. तसंच तिथली निवडणूक प्रक्रिया नव्यानं घेतली पाहिजे. पण निवडणूक आयोगानं काय केलं? निकाल थांबवलाय, तो सर्व निकालाबरोबर जाहीर करणार, कारण आयोग त्यांचा गुलाम आहे. बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकही उमदेवार नाही? पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही? हा काय योगायोग आहे की काय आहे? – उद्धव ठाकरे
खासकरून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, मीरा–भाईंदर, कल्याण–डोंबिवली, संभाजीनगर इतर सगळ्या महापालिका, इथं लोकांनी आता राग व्यक्त करणं गरजेचं आहे. लोकांकडून जर पुन्हा याच सत्ताधाऱ्यांना मतदान होत असेल… पैसे देऊन माघार वगैरे तूर्त बाजूला ठेवू, पण लोकांनी मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर आपण म्हणतो ना, राजानं मारलं काय, पावसानं झोडलं काय, तक्रार कुणाकडं करायची? तशी गत होईल. – राज ठाकरे
मला एवढंच वाटतं की, ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे. मला खरंच प्रश्न पडतो, देवी–देवता आहेत का? आणि आहेत तर ते हे फक्त का बघत बसलेत? – राज ठाकरे
पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्यांचा डोलारा हा फक्त नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही त्यांनीच बसवलेली माणसं आहेत सगळी. यातला बसलेला माणूस कोणीच नाही. बसलेला म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेला आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचं ऐकतो, मालकाचं ऐकतो. मालक जे सांगेल, त्याप्रमाणं काम करायचं. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही. – राज ठाकरे
हवेचा किंवा प्रदूषणाचा जो काही निर्देशांक म्हणतो आपण, हा एवढा खराब कधी झाला होता का? हे विचारण्याचं कारण असं की, आता भाजपवाल्यांनी जी काही विकासाच्या प्रचाराची हार्ंडग्ज लावलीत, ही विकासाची गती नाही. ह्यांची विनाशाची गती आहे. नियोजनशून्य विकास. – उद्धव ठाकरे
जिथं जावं तिथं रस्ते खोदलेत, मोठमोठय़ा इमारती उभ्या राहतायत. मेट्रो असेल, काही ठिकाणी पूल असेल. हे सगळं हवं आहे यात दुमत नाही. पण एका वेळी ते सगळं काढलेलं आहे. मुंबईच्या खर्चाचाही ताळमेळ बसवला गेला पाहिजे. नाहीतर आतासारखी परिस्थिती ओढवते. मुंबईकर म्हणून तुम्ही जो कर भरता, त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं… प्रदूषण. – उद्धव ठाकरे
































































