मुंबईच्या स्वाभिमानाचा हुंकार… मराठी अस्मितेचा एल्गार…! शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीची शिवतीर्थावर रविवारी ऐतिहासिक सभा

मराठी अस्मितेचा आणि मुंबईच्या स्वाभिमानाचा हुंकार पुन्हा एकदा शिवतीर्थावर घुमणार आहे. शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ऐतिहासिक युती आणि राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर रविवारी 11 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायं. 5 वाजता तिन्ही पक्षांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या तोफा एकाच व्यासपीठावरून धडाडणार असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या सभेकडे लागले आहे. ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा बदलणारी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र, मुंबई काही मूठभर उद्योगपतींच्या घशात घालण्याचे कारस्थान आणि भूमिपुत्रांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत उपऱ्यांना पायघड्या घालण्याच्या योजना या सगळय़ांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मराठी माणसाच्या नोकरी, घर, उद्योग आणि स्वाभिमानावर घाला घालणाऱ्या शक्तींविरोधात ही युती आक्रमकपणे उतरली असून रविवारी होणाऱ्या सभेतून स्पष्ट राजकीय दिशा दिली जाणार आहे.

जय्यत तयारी; सुरक्षिततेचे विशेष नियोजन

या सभेसाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. व्यासपीठ, ध्वनी व्यवस्था, शिस्त आणि सुरक्षिततेचे विशेष नियोजन करण्यात आले असून सायंकाळी पाच वाजता सभा सुरू होणार आहे. या सभेची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि मंत्रालयापासून संसदेपर्यंत रंगली असून रविवारी दादर मराठी अस्मितेच्या घोषणांनी दणाणून जाणार आहे.

शिवसैनिक-मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह

शाखाशाखांतून या सभेच्या तयारीचा जोर सुरू असून महापालिकांवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. अनेक वर्षांनंतर राजकारणात निर्माण झालेल्या या मराठी एकजुटीमुळे विरोधकांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

  • दिनांक 11 जानेवारी 2026
  • स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान
  • वेळ सायंकाळी 5 वाजता

ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून मुंबई, ठाणेसह 29 महापालिकांवर भगवा फडकवण्याची मुहूर्तमेढच या सभेतून रोवली जाणार आहे.

मराठी एकजुटीचे विराट दर्शन

मुंबई विकासाचा वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर युतीला पाठिंबा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर होणारी ही संयुक्त सभा म्हणजे केवळ राजकीय मेळावा नसून मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि ताकदीचा मानदंडच ठरणार असून मराठी एकजुटीचे विराट दर्शन घडणार आहे.