
‘मराठी माणसांनी बलिदान देऊन मिळवलेली मुंबई दोन गुजराती आपल्या डोळय़ांदेखत गिळायला निघाले आहेत. अशा वेळी तुझं-माझं करत बसू नका. निष्ठा विकू नका. आपण कोणाविरुद्ध लढतो आहोत हे लक्षात घ्या. मुंबईवरचा भगवा झेंडा उतरवण्याचं पाप हातून होऊ देऊ नका. तुम्हाला भगव्याची शपथ आहे,’ अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना घातली.
शिवसेना भवन येथे आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मुंबईसह महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीची जाणीव उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वांना करून दिली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी भाष्य केले.
‘मुंबई आपल्याला मिळालेली नाही, आपण ती मिळवली आहे. रेकॉर्डवर 107 हुतात्मे असले तरी 200 ते 250 लोकांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. मुंबई गुजरातला हवी होती म्हणून हा संघर्ष झाला होता. मोरारजी नावाचा नरराक्षस तेव्हा मुख्यमंत्री होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाशी भाजप किंवा जनसंघाचा काडीमात्र संबंध नव्हता. आता मात्र आपण बलिदानातून मिळवलेली ही मुंबई त्यांना गिळायची आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.
‘भगव्या झेंडय़ाने शिवरायांच्या काळापासून अनेक फुटी पाहिल्यात, आपल्याच माणसांनी केलेले अनेक वार पाहिले आहेत. तरीही तो फडकत राहिलेला आहे. नियतीची इच्छा असेल म्हणूनच कदाचित शिवरायांचा हा भगवा शिवसेनाप्रमुखांकडे, शिवसेनेकडे आला. तो उतरू देण्याचे पाप शिवसैनिकांच्या हातून होता कामा नये,’ अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ‘धनुष्यबाण भलेही आपल्याकडे नसेल, पण मशाल आपल्या हाती आहे. या मशालीशी, मराठी मातीशी, आईशी गद्दारी करू नका,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जातीपातीत फसू नका, हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी पानिपतचे उदाहरण दिले. या बैठकीला मुंबईतील आमदार, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख उपस्थित होते.
कोविड काळातील ‘मुंबई मॉडेल’चे प्रकाशन
कोविड संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या जनसेवेची सविस्तर माहिती देणाऱया ‘मुंबई मॉडेल’ या पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, उपनेता किशोरी पेडणेकर, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, सचिव सूरज चव्हाण, पुस्तिकेचे संकलक कीर्तिकुमार शिंदे, अखिल चित्रे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाईटपणा घ्यायला तयार
‘मला नाशिक, ठाणे, पुणे यांसह अनेक महापालिकांकडे लक्ष द्यायचे आहे. तिथले निर्णय घ्यायचे आहेत. वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. सर्व विभागप्रमुखांना सांगतो की, तुम्ही वाईट होऊ नका. मी वाईटपणा घेतो. वाईटपणा आला तरी चालेल, पण महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही निष्ठा विकू नका. आज तो क्षण आला आहे. तुमच्यापैकी एकही फुटता कामा नये. भाजपने आपला दुरुपयोग करून घेतला. काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आहे,’ असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी एकजूट राहण्यासाठी साद घातली.
म्हणून मनसेसोबत युती केली
‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात प्रबोधनकार ठाकरे आघाडीवर होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत मराठी टिकावी, वाढावी म्हणून लढा दिला. आज तुमच्या साथीने मी ही लढाई पुढे नेत आहे. मराठी आणि महाराष्ट्रासाठी मी मनसेशी युती केली आहे. राज आणि मी एकत्र येण्यामागे भावनात्मक आणि पारंपरिक कारण आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाळगून तुझं-माझं करून मुंबई त्यांना आंदण देणार असाल तर न लढलेलं बरं. दुफळी करून हरण्यापेक्षा त्यांना केकवॉक द्या. मी हे अगतिकतेनं बोलत नाही. माझ्या खुर्चीत बसून बघा. मी प्रत्येक वॉर्डामध्ये चार माणसं देतो, त्यातून तुम्ही एक निवडा. मला मान्य असेल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सगळंच मनासारखं कसं होणार
‘युती किंवा आघाडी असते तेव्हा शंभर टक्के कोणाच्याही मनासारखं होत नाही. काही आपल्या हक्काच्या जागा दुसऱयासाठी सोडाव्या लागतात, तर काही त्यांच्या हक्काच्या जागा आपल्याकडे येतात. युती करायची, पण माझा वॉर्ड न देता करायची हे शक्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मुंबईचा घास गिळताना शिवसेनेखेरीज दुसरा कोणताही काटा घशात अडकू शकत नाही हे माहीत असल्यामुळे त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना खतम झाली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला ते मोकळे झाले. हे पाप होऊ देऊ नका.
कोणती जागा आपल्याला मिळाली पाहिजे, कोणाला तिकीट द्यायला पाहिजे हे मलाही माहीत असतं. पण सगळय़ा गोष्टी मनासारख्या होत नाहीत. मी एखाद्याला उमेदवारी दिली नाही तर तो भाजपमध्ये जाऊ शकतो. पण माझ्या मनासारखं झालं नाही तर मी भाजपमध्ये जाऊ शकतो का?




























































